पीटीआय, दंतेवाडा (छत्तीसगड)
पोलिसांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी वाहनात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात १० पोलीस जवान शहीद झाले असून वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी १च्या सुमारास हा हल्ला झाला. गेल्या दोन वर्षांत छत्तीसगडमध्ये झालेला हा सर्वात मोठा नक्षलवादी हल्ला आहे.
बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्भा भागामध्ये काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डिस्ट्रिक्ट रिझव्र्ह गार्ड या नक्षलविरोधी पथकाचे जवान छोटय़ा मालवाहू वाहनातून त्या भागात गेले होते. तिथून परत येत असताना अरनपूरआणि सामेली या दोन गावांदरम्यान नक्षलवाद्यांनी वाहनामध्ये ‘आयईडी’ (इम्पोवाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) स्फोट घडविला. यामध्ये १० जवान आणि वाहनाचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट इतका भयानक होता की घटनास्थळी रस्त्यावर तब्बल १० फूट खोल विवर पडले. या स्फोटामध्ये वाहनही पूर्णत: भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून परिसरामध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
शाह-बघेल यांच्यात चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. ‘छत्तीसगडमध्ये पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे व्यथित आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून राज्य सरकारला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना आहे,’ असे ट्वीट शाह यांनी केले. तर बघेल यांनीही नक्षलवाद संपविण्यासाठी एकत्रित काम करणार असल्याची ग्वाही ट्विटरद्वारे दिली. छत्तीसगडमधील नक्षलवादाचा अंत समीप आल्याचेही त्यांनी नमूद केले.
छुप्या हल्ल्याचे आव्हान
केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्यांकडे अत्याधुनिक रायफल्स आणि त्यासाठी आवश्यक काडतुसे संपत आली आहेत. त्यामुळे आता सुरक्षा पथकांशी समोरासमोर लढा देणे टाळून आयईडी किंवा भूसुरुंगांचे स्फोट घडवून छुपे हल्ले वाढले आहेत. अशी स्फोटके शोधून नष्ट करण्याची सुरक्षा पथकांकडील यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे हे हल्ले रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अभियान किती प्रभावी?
बस्तर भागात नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबवल्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या दाव्यांना बुधवारच्या हल्ल्याने छेद दिला. बिजापूर व सुकमा हे दोन जिल्हे सर्वाधिक नक्षलप्रभावित म्हणून ओळखले जातात. त्या तुलनेत हिंसक कारवाया कमी असलेल्या दंतेवाडामध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे तेथेही चळवळीची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. गस्तीवर असलेल्या जवानांनी मानक कार्यपद्धतीचे पालन न करणे ही नेहमीची चूक या वेळीही कारणीभूत ठरली आहे. हिंसक कारवाया कमी झाल्या म्हणजे चळवळ संपली असा अर्थ काढणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेने दाखवून दिले आहे. बंदुकीच्या चापावर बोट असलेल्या नक्षलवादी चळवळीबाबत गाफील राहणे किती धोक्याचे ठरू शकते, हेदेखील अधोरेखित झाले आहे.