देशातील सर्वाधिक नक्षलप्रभावित राज्य अशी ओळख असलेल्या छत्तीसगडमध्ये सत्ताप्राप्तीसाठी निकाराची लढाई लढणाऱ्या भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रचारात वाढत्या नक्षलवादाचा मुद्दा कुठेही समाविष्ट करण्यात आलेला नाही. प्रचारातून या मुद्दय़ाला हद्दपार करण्यामागे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे सोयीस्कर राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा येथे ऐकायला मिळते.
देशातील अनेक राज्यांत नक्षलवादाच्या समस्येने मूळ धरले असले तरी तब्बल १४ जिल्हे या समस्येच्या प्रभावात असलेले छत्तीसगड हे एकमेव राज्य आहे. गेल्या मे महिन्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात काँग्रेसचे बडे नेते ठार झाल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता. विधानसभेची निवडणूकच या मुद्दय़ाभोवती केंद्रित असेल असेही तेव्हा बोलले गेले. प्रत्यक्षात टीव्ही व वृत्तपत्रांतून झळकणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या जाहिरातींत नक्षलवादाचा उल्लेखच नाही.
मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ नेते रमेश पटेल यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी नक्षलवादाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी एकटय़ा राज्याची नाही असे सांगत केंद्राकडे बोट दाखवले. मे महिन्यात झालेला हल्ला कुणी घडवून आणला हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला त्यात पडायची गरजच उरली नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या कटकारस्थानाकडे लक्ष वेधले.
काँग्रेसने नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे पण दरभा घाटीतील हल्ला प्रकरणाचे राजकारणच भरपूर झाल्याने आता त्यातून फायदा मिळेल असे काहीही शिल्लक राहिले नाही, असे पक्षाचे नेतेच बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या साधना मुदलियार यांचे पती उदय या हल्ल्यात ठार झाले होते. त्यांना या संदर्भात विचारले असता, नक्षलवादाचा मुद्दा प्रचारात नसला तरी जनतेच्या मनात आहे. मे महिन्यात झालेला हल्ला रमणसिंगांचे अपयश आहे व त्याची फळे भाजपला भोगावी लागतील, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस-भाजपची सावधगिरी
*नक्षलवादाचा मुद्दा प्रचारात प्रामुख्याने आणला तर मे महिन्यात झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या हत्याकांडाचा मुद्दा काँग्रेसकडून समोर केला जाईल व राज्य सरकारचे अपयश असल्याचा प्रचार होईल, या भीतीमुळेच भाजप या मुद्दय़ाला स्पर्श करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
*काँग्रेसच्या जाहिरातीतसुद्धा नक्षलवादाचा उलेख नाही. मेमध्ये काँग्रेस नेत्यांवर झालेला हल्ला काँग्रेसचे नेते अजित जोगी यांनीच घडवून आणला, असा आरोप काँग्रेसच्याच नेत्यांनी जाहीरपणे केला होता. या पाश्र्वभूमीवर नक्षलवादाचा उल्लेख प्रचारात प्रामुख्याने केला तर बूमरँग होण्याची काँग्रेसला भीती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा