पोलीस उपनिरीक्षकासह चार हवालदार निलंबित
२०१३ च्या जिराम खोऱ्यातील नक्सली हल्ल्यातील सहभागी बमन आलीस दिनेश (२६) याने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची पुष्टी नारायणपूर जिल्ह्य़ाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक मीना यांनी केली आहे. सोमवारी रात्री छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्य़ात ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र बागेलसह चार पोलीस हवालदारांना निलंबित केले आहे.
बमनवर २५ मे २०१३ ला जिरम खोऱ्यातील हल्ला, दर्भा (बस्तर)मध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यासह ३१ जणांची हत्या तसेच एप्रिल महिन्यात सुखमाच्या तोंगपाल परिसरातील तहाकवाडा अंबूश हल्ल्यात १५ सुरक्षारक्षकांसह एका नागरिकांच्या हत्येतील सहभागाचा आरोप होता.
सुखमा जिल्ह्य़ात मागील तीन वर्षांपासून नक्षली चळवळीत बमन सक्रिय होता. ओरच्चा पोलिसांनी त्याला तोडरबेडा या मूळ जन्मस्थानावरून अटक केली होती.
आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शविल्यानंतर बमनला पोलीस चौकशीसाठी नारायणपूरला आणण्यात आले होते. या चौकशीतून नक्षलवाद्याकडील हत्यारांबाबत आणि त्याच्या पुढील योजनाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. पण त्यापूर्वीच कोठडीत स्वत:ला कोंडून घेताना त्याने आत्महत्या केली.

Story img Loader