झारखंडमधील लातेहार जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानाच्या मृतदेहात नक्षलवाद्यांनी, शस्त्रक्रिया करून स्फोटके (आयईडी) ठेवल्याचे उघड झाले आहे.
रांची येथील शासकीय रुग्णालयात जवानाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूच्या निदर्शनास ही बाब आली. शहीद जवानाच्या पोटांत दीड किलो वजनाची स्फोटके टाके घालून दडविण्यात आली असल्याचे त्यांना आढळले.
‘अँबुश’ (अतिरेक्यांना कोंडीत पकडून ठार मारण्याची लष्करी कारवाई) झाले त्या ठिकाणीच २९ वर्षीय बाबुलाल पटेल यांचा मृतदेह पडला होता. त्याचे शवविच्छेदन गुरुवारी सकाळी होणे अपेक्षित होते. मात्र डॉक्टरांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने मृतदेहाची पाहणी कारावी असे सुचविले.
या पाहणीत शरीरात स्फोटके दडविल्याचे स्पष्ट झाले. ही स्फोटके त्यांच्यावर थोडासासुद्धा भार पडला तर फुटू शकणारी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
७ जानेवारी रोजी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ९ जवान, झारखंडच्या नक्षलवादविरोधी पथकातील १ आणि चार नागरिक ठार झाले, तर ९ नक्षलवादीही या चकमकीत मारले गेले असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला.