पीटीआय, पंचकुला

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची फेरनिवड झाली. गुरुवारी त्यांचा शपथविधी होईल. भाजप विधिमंडळ पक्षनेते सैनी यांची एकमताने निवड करण्यात आली.सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव कृष्णकुमार बेदी यांनी दिला, त्याला ज्येष्ठ आमदार अनिक विज यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे विज यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे वारंवार जाहीर केले होते. बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अमित शहा यांनी सैनी यांच्या निवडीची घोषणा केली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे अन्य एक केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. निवडीनंतर सैनी यांनी हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. गेल्या वर्षी मार्चमध्ये मनोहरलाल खट्टर यांना हटवून सैनी यांच्याकडे राज्याची सुत्रे देण्यात आली.९० सदस्य असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजपचे ४८ तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या. भाजप आणि हरियाणाच्या जनतेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, असे अमित शहा यांनी पंचकुला येथील बैठकीत स्पष्ट केले.

यावेळी मनोहरलाल खट्टर, प्रभारी धर्मेंद्र प्रधान, सहप्रभारी बिल्पब देव उपस्थित होते. गुरुवारी शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.