हरियाणा राज्यात मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे राजीनामा दिल्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यानंतर आता नायब सिंह सैनी यांचा शपथविधी राजभवनात संपन्न झाला.
खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या आणि हरियाणा भाजपाचे प्रभारी बिप्लब देव यांच्या उपस्थितीत नायब सिंह सैनी यांची एकमताने विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रीमंडळ विस्तार व नंतर लोकसभेसाठीचं जागावाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे.
मुख्यमंत्री खट्टर यांना डच्चू देऊन हरियाणामध्येही भाजपचा ‘गुजरात पॅटर्न’
खट्टर यांच्या मंत्रिमंडळात १४ मंत्री होते. जननायक जनता पार्टीकडून उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तीन मंत्री होते. खट्टर यांच्यासह त्यांनीही राजीनामा दिला. आज मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला.
नायब सिंह सैनी कोण आहेत?
ओबीसी समाजाचे नायब सिंह सैनी (५४) कुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार आहेत. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपाने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. १९९६ साली नायब सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. संघटन बांधणीपासून कामाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्यांचा भाजपामध्ये वरिष्ठ नेतेपदापर्यंतचा प्रवास पार पडला. २००२ साली अंबाला जिल्ह्याचे भाजपा युवा मोर्चाचे ते जिल्हा सरचिटणीस झाले. त्यानंतर २००५ साली त्यांची अंबालाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली.
२०१४ साली नारायणगड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. २०१६ साली त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान सैनी कुरुक्षेत्र लोकसभेतून निवडणुकीस उभे राहिले आणि त्यांचा विजयही झाला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ३.८३ लाख मताधिक्यांनी पराभव केला होता.