‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ अर्थात एनसीबीचे डीडीजी व मुंबई झोन आणि गोव्याचे प्रभारी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांनी आयआरएस समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमची चौकशी केली होती. अलीकडेच त्यांनी आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तपास करताना अनेक त्रुटी आढळल्याचा अहवाल त्यांनी सादर केला आहे.
यानंतर आता ज्ञानेश्वर सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे उत्तरेकडील काही राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे महाराष्ट्र आणि गोव्याची जबाबदारी होती. ज्ञानेश्वर सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांच्या कामाची चौकशी केली होती.
हेही वाचा- Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा
संबंधित अहवालात त्यांनी समीर वानखेडे आणि इतर एनसीबीच्या टीमने नियमांचं पालन न केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे वानखेडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगासमोर सांगितले होते.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण काय होतं?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरून आर्यन खानला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (NCB) ऑक्टोबर २०२१ मध्ये अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणात आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन मिळाला. या प्रकरणात एनसीबीने अलीकडेच आर्यन खानला क्लिन चीट दिली आहे