पीटीआय, नवी दिल्ली
शालेय अभ्यासक्रमात केलेल्या बदलांचे समर्थन करताना गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज नाही, अशी भूमिका एनसीईआरटीने घेतली आहे. अभ्यासक्रमाचे ‘भगवीकरण’ होत असल्याच्या आरोपाचेही एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत खंडन केले.
एनसीईआरटीच्या इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या नव्या पुस्तकात बाबरी मशिदीचा उल्लेख ‘तीन घुमटांची वास्तू’ असा करण्यात आला आहे. अयोध्या प्रकरणाला काही मजकूर वगळून चारऐवजी दोनच पाने देण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अभ्यासक्रमात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यावरून विरोधकांसह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सकलानी यांनी बदलांचे जोरदार समर्थन केले. ‘‘विद्यार्थी आक्रमक व्हावेत आणि समाजात तेढ निर्माण व्हावी असे शिक्षण आपण द्यायचे आहे का? त्यांना दंगलींबद्दल शिकविण्याची गरज आहे का? ते मोठे झाल्यानंतर त्याबाबत माहिती करून घेऊ शकतील, पण पाठ्यपुस्तकातून कशाला?’’ असे प्रश्न सकलानी यांनी विचारले आहेत. १९८४च्या दंगलींबाबत अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातून काढल्यानंतर एवढी ओरड झाली नव्हती, असा दावाही त्यांनी केला. जर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला असेल, तर तो अभ्यासक्रमाचा भाग का नसावा? त्यात समस्या काय आहे, असा सवालही त्यांनी केला. एखादी गोष्ट कालबाह्य झाली असेल, तर ती बदलली पाहिजे. यात कुठेही अभ्यासक्रमाचे ‘भगवीकरण’ आहे असे वाटत नाही. मुलांना तथ्ये माहिती व्हावीत म्हणून आपण इतिहास शिकवतो, युद्धभूमी तयार करण्यासाठी नव्हे, असे प्रतिपादन सकलानी यांनी केले आहे.
हेही वाचा >>>अमेरिकेत दोन ठिकाणी गोळीबार; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
राममंदिर, गुजरात दंगली याचा अभ्यासक्रमातील संदर्भ बदलल्यावर झालेल्या टीकेला एनसीईआरटीच्या संचालकांनी प्रत्युत्तर दिले व सर्व आरोप फेटाळून लावले…
आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत आणि हा या पाठ्यपुस्तकांचा उद्देश आहे. आपल्या शिक्षणाचा उद्देश हिंसक आणि खचलेले नागरिक घडविणे हा नाही… द्वेष आणि हिंसा हे शिकविण्याचे विषय नाहीत. – दिनेश प्रसाद सकलानी, संचालक, एनसीईआरटी