स्मार्ट सिटीसाठी देशभरातून निवडलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचाही समावेश करावा आणि पुणे मेट्रोच्या कामाला गती द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
या शिष्टमंडळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पिंपरी-चिचवडच्या महापौर शकुंतला दराडे यांचा समावेश होता. स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या देशातील ९८ शहरांची यादी नुकतीच व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश आहे. मात्र, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्य सरकारने केद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रितपणे समावेश केला होता. पण केंद्र सरकारने केवळ पुण्याचाच अंतिम यादीमध्ये समावेश केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. स्मार्ट सिटीसाठीच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड वरच्या स्थानावर असतानाही ऐनवेळी या शहराला वगळण्यात आल्यामुळे व्यंकय्या नायडू यांची भेट घेण्यात आली. या विषयाची आपण दखल घेतली असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन व्यंकय्या नायडू यांनी शिष्टमंडळाला दिले.
पुणे मेट्रोच्या कामाला आणखी गती देण्यासाठी महाराष्ट्र सदनामध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते. या बैठकीमध्येही राज्यातील रस्ते विकासावरही चर्चा करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा