गेल्या काही दिवसांपासून NCERT नं घेतलेल्या एका निर्णयावरून देशभर चर्चा चालू आहे. अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातून चार्ल्स डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत वगळल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या आधीही NCERT नं पाठ्यपुस्तकातून इतिहासाबाबतचे संदर्भ वगळल्यामुळे त्यावरून टीका झाली होती. आता पुन्हा एकदा या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर सरकारला लक्ष केलं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे.
नेमकं झालं काय?
एनसीईआरटीनं अभ्यासक्रमातील ९वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच काढून टाकला आहे. डार्विनच्या या सिद्धांताला आधीच भारतातील काही समाजघटकांकडून विरोध होत आहे. ईश्वराच्या कृतीतून सृष्टी निर्माण झाल्याचा दावा करताना मनुष्यप्राणी माकडापासून मनुष्य हळूहळू उत्क्रांत होत गेला हा डार्विनचा सिद्धांत काही घटकांकडून नाकारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एनसीईआरटीच्या निर्णयावर देशातील वैज्ञानिक आणि इतिहासतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
डार्विनचा सिद्धांत वगळण्यात आल्यानंतर त्यावर देशभरातील १८०० वैज्ञानिक, शिक्षक, प्रशिक्षक, प्राध्यापक आणि विज्ञानप्रेमींनी आपल्या सह्यांनिशी एक खुलं पत्रच एनसीईआरटीला लिहून या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, अशीही भूमिका या पत्रातून मांडण्यात आली. आता यावर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट?
जितेंद्र आव्हाडांनी NCERT च्या या निर्णयावर आक्षेप घेतानाच खोचक टीका केली आहे. “चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झालं ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका. म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद हा आता संपल्यात जमा. म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील”, असं आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हे बदल आम्हाला मान्य नाहीत असे पत्रक देशभरातील अनेक शास्त्रज्ञांनी काढले आहे. विरोध केला जातोय हे कौतुकास्पद आहे”, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.