सागर कासार, पुणे

राज्याच्या विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माझे काम पाहिले असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप निश्चित दिली असती, असे भावूक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी लोकसत्ता. कॉमला मुलाखत दिली असून या मुलाखतीत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या प्रश्नावर धनंजय मुंडे भावूक झाले होते. राज्याच्या विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी माझे काम पाहिले असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप निश्चित दिली असती, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी मुलाखतीमध्ये भाजपावर टीकेची झोड उठवली. २०१४ च्या निवडणुकीत जनतेला अनेक आश्वसनं देऊन सत्ता मिळवली. पण सत्ता आल्यावर भाजपाला आश्वासनांचा विसर पडला. या आश्वासनांवर भाजपाकडून कोणताही नेता या निवडणुकीत बोलत नाही. देशात आणि राज्यात कोणती विकास कामे केली, या मुद्यावर मते मागण्याची आवश्यकता होती. मात्र असे होताना दिसत नसून सत्ताधारी पक्ष शहीद जवानांवर मते मागताना दिसत आहे, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, राज ठाकरेंबाबतही त्यांनी भाष्य केले. राज ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आकर्षित असून यंदा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपचा भांडाफोड केला. या अशा सभाचा नवा पायंडा त्यांच्याकडून पडला गेला आहे. ही चांगली बाब असून या निवडणुकीत आघाडीला निश्चित फायदा निश्चित होईल. असे त्यांनी सांगितले.