लोकसभा आणि संसदेत घुसखोरी करून चार तरुणांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी एकच खळबळ उडवून दिली होती. २००१२ साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच ही घुसखोरी झाल्यामुळे या कृतीकडे संशयाने पाहिले गेले. त्यानंतर तपास यंत्रणांनी चार घुसखोर तरूण आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर दोघांना अटक केली होती. मागच्या दोन महिन्यांपासून त्यांची चौकशी सुरू असून त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. काल (३१ जानेवारी) न्यायालयात या तरुणांना हजर केले असता त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून हे दावे केले आहेत. ते म्हणाले, “हे अत्यंत भयावह आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या तरुणांची सुनावणी आज कोर्टासमोर समोर होती. यावेळी “विरोधी पक्षांच्या नेत्यांचे नाव घ्या”, असा दबाव टाकत पोलिसांनी आम्हाला प्रचंड यातना दिल्या. आम्हाला इलेक्ट्रिक शॉक दिले आणि आमच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी दबाव बनवला”, असे आरोप या तरुणांनी केले आहेत.”
“एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल अशा पद्धतीने हे सरकार आपल काम करत आहेत. खरतर सदर तरुणांना ज्या भाजपा खासदारांनी पास दिला, त्यांची साधी चौकशी तर सोडाच उलट त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.त्याचवेळी पकडलेल्या तरुणांनी, विरोधी पक्षातील नेत्यांची नावे घ्यावीत, यासाठी त्यांच्यावर दबाव बनवला जात आहे. या पोरांनी धिटाई दाखवत आज कोर्टासमोर आपली परिस्थिती मांडली. जर या पोरांनी ही धिटाई दाखवली नसती तर काय…? हा नुसता विचार करून भीती वाटते. राजकीय फायद्यासाठी कुठ घेऊन जाताहेत तुम्ही या देशाला?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
संसदेत १३ डिसेंबर रोजी काय घडले?
१३ डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये शून्य प्रहरातील चर्चा सुरू असताना दुपारी १ च्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडया घेतल्या. ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत त्यांनी पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांडया फेकल्या. त्यामुळे सभागृह धुराने भरून गेले. घुसखोरांना उपस्थित खासदारांनी चोप दिला व सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. त्याच वेळी संसदभवन परिसरात नीलम आझाद आणि अमोल शिंदे या दोघांनीही घोषणाबाजी करत धुराच्या नळकांडया फोडल्या. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. अमोल हा लातुर जिल्ह्यातील असून शर्मा लखनऊ, मनोरंजन म्हैसूर तर नीलम हरियाणातील हिस्सारची राहणारी आहे.