बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षाची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत देशभरातील प्रमुख नेते सामील झाले होते. संबंधित नेत्यांनी आगामी निवडणुकीमध्ये एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्षाची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशात बदल घडवण्याची सुरुवात पाटणा येथील बैठकीतून झाली आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “सध्या देशात आपण दररोज नवनवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्यांचा सामना केला पाहिजे. आमच्यात काही मतभेद असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्परांमधील मतभेद विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की, पाटण्यापासून देशात बदल घडवण्याची सुरुवात झाली आहे.”

“मला आठवतंय की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने पाटणा येथून एक संदेश दिला होता. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासाने याची दखल घेतली. आजच्या परिस्थितीत नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्रपक्ष इथे आले. या बैठकीत आम्ही एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही देशाला नवी वाट दाखवण्याचं काम सुरू केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता आमच्या निर्णयाचं स्वागत करेन” असंही शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader sharad pawar first reaction after opposition meeting in patana bihar rmm
Show comments