मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने घटनेची दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराबाबात आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन पावलं उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे.”

न्यायालयाच्या या निर्देशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान मोदींसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली तेव्हा मोदींचं तोंड उघडलं, अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप

मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या, “गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळतंय. मणिपूरमध्ये अत्याचार होत आहेत, जाळपोळ केली जात आहे. मणिपूरमध्ये डबल इंजिन असलेलं मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. हे सरकार काहीही करत नाही. काल जो व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामध्ये सगळं दिसतंय की, दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे. त्या महिलांवर सामूहिक अत्याचार झाले आहेत.”

हेही वाचा- अनुयायी महिला बलात्कार प्रकरण; तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला पुन्हा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर

“ही घटना ७० दिवसांपूर्वीची आहे. पण आज ती बाहेर आली. जेव्हा देशातील सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली, तेव्हा मोदींचं तोंड उघडलं. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा मोदी सरकारचा नारा आहे. पण आज देशातील महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. तरीही मोदी सरकार गप्प का आहे? असा प्रश्न आम्हाला पडलाय. महिलांमध्ये सरकारविरोधात संताप आणि चीड आहे,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

हेही वाचा- “आधी भावाची हत्या केली मग बहिणीला नग्न करत धिंड काढली”, मणिपूरमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं?

“महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहलाही मोदी सरकारने सोडून दिलं आहे. म्हणजे मोदी सरकार महिलांवर अत्याचार सरकार आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र आणि देशातील महिलांना पडला आहे. याचं उत्तर मोदी सरकारने दिलं पाहिजे. मोदींकडे उत्तर नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. परंतु महिलांच्या विरोधातलं हे सरकार आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला.

Story img Loader