उध्दव ठाकरे यांच्या उक्तीत आणि कृतीत मोठा फरक आहे. व्यासपीठावरून शेतकर्यांचा कळवळा दाखवून देणारे ठाकरे प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांना भेटायला देखील तयार नाहीत. तडवळा येथील शेतकर्यांना त्यांनी भेट दिली असती तर कदाचित एका शेतकर्याचे प्राण वाचले असते. राज्यभर प्रचार करीत फिरणार्या उध्दव ठाकरे यांना दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नाही. तडवळा येथील शेतकर्यांच्या आत्महत्येला तीन दिवस झाले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हा नोंद केलेला नाही. ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
कसबे तडवळा येथील शेतकरी आत्महत्येला तीन दिवस झाले आहेत. पोलिसांकडून अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. शेतकर्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिवसेना उमेदवाराचे स्पष्ट नाव लिहिले आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे ? तीन दिवसांपासून गुन्हा नोंद करण्यास ते का टाळाटाळ करीत आहेत, असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण शेतकरी कुटूंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. सोमवारपर्यंत गुन्हा नोंद न झाल्यास मुंबई येथे पोलीस महासंचालकांची भेट घेवून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले.
ढवळे यांच्याप्रमाणेच 72 शेतकर्यांची फसवणूक करून मानहानी करण्यात आली आहे. त्यापूर्वी ढोकी पोलिसात जून 2016 साली शेतकर्यांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी त्यावेळी योग्य कारवाई केली असती तर कदाचित ढवळे यांच्यावर असा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली नसती. पोलिसांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे देखील ढवळे यांनी आत्महत्या केली आहे. आणखी काही शेतकर्यांच्या वाट्याला अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार असतील. त्यांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा नोंद करावा, अन्यथा आपण निवडणूक आयोगाकडे देखील पोलीस प्रशासन आरोपी असलेल्या उमेदवाराला पाठीशी घालत असल्याची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.