गोंडाल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चंदू वघासिया यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. २००८ मधील पाणीयोजना घोटाळ्यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जलवितरण मंडळाचे कार्यकारी अभियंता के. एन. पटेल यांनी या योजनेत झालेल्या ५० लाख रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून वघासिया यासंदर्भात पोलिसांना हवे होते.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी काही निधी पुरवला होता. मात्र कोटडा संघानीच्या सरपंचपदी असताना वघासिया यांनी याचा गैरवापर करून त्यातील काही भाग अन्य ठिकाणी वळवला. वघासिया यांना याप्रकरणी रविवारी शहरापासून ३९ कि.मी. अंतरावर असलेल्या त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली, असे पोलीस उपमहानिरीक्षक एन. एन. मेहता यांनी सांगितले.
वघासिया यांना काल रविवारी रात्री न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले असता त्यांनी त्यांची रवानगी येथील जिल्हा कारागृहात केली.
राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून या विभागाकडून उद्या वघासिया यांची कस्टडी घेण्यात येईल. याप्रकरणी वघासिया यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. आतापर्यंत अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांतून लोकांसमोर येणारे वघासिया याप्रकरणी मात्र अटक टाळण्यात यशस्वी ठरत होते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा