राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी अलीकडेच शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद देण्यात आलं. अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण असल्याचं बोललं जात आहे. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना (अजित पवार गट) निधी दिला जात नसल्याची तक्रार केल्याचंही बोललं जात आहे. यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे नक्कीच नाराज आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी ही बाब लक्षात येते, असं विधान रोहित पवार यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “…तर शिंदे गट अडचणीत येईल”, राहुल नार्वेकरांचा उल्लेख करत रोहित पवारांचं सूचक विधान
“अजित पवारांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ते नक्कीच नाराज आहेत, असं कुठेतरी जाणवतं. त्यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. भाजपाला लोकनेता कधी पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला किंवा बाहेरून आलेला, कोणताही लोकनेता पटत नाही. अशा लोकनेत्यांची ताकद भाजपा हळूहळू कमी करतो. तीच गोष्ट भाजपाने अजितदादांच्या बाबतीत केली आहे,” असं विधान रोहित पवार यांनी केलं.