पीटीआय, नवी दिल्ली : लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने दिलेल निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवणाऱ्या कनिष्ठ निकालाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोहम्मद फैजल अडचणीत आले आहेत.
या खटल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन सदोष होता. त्यांनी फैजल यांचा विचार केवळ लक्षद्वीपचे खासदार या एकाच बाजूने केला, कायद्याचा नाही, असे निरीक्षण न्या. बी व्ही नागरत्ना आणि न्या. उज्जल भूयाँ यांच्या खंडपीठाने नोदवले. मात्र, फैजल यांची खासदारकी रद्द केली जाऊ नये, अशी विनंती त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. ती मान्य करत, फैजल यांना किमान सहा आठवडे खासदार म्हणून अपात्र ठरवू नये, असेही न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा केरळ उच्च न्यायालयाकडे पाठवले आणि सहा आठवडय़ांच्या कालावधीत फैजल यांच्या अर्जावर नव्याने निवाडा करण्यास सांगितले.