Sunetra Pawar : राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!”

लोकसभेत हरल्या, पण राज्यसभेत गेल्या

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात त्यांच्याच नणंद सुप्रिया सुळे उभ्या ठाकल्या होत्या. सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या पारंपरिक लोकप्रतिनिधी असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासमोर कडवे आव्हान होते. मात्र हे आव्हान सुनेत्रा पवारांना झेलता आले नाही. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, सुप्रिया सुळे बहुमताने लोकसभेत पुन्हा निवडून गेल्या. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना उतरून चूक केली, असं उघडपणे मान्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची वर्णी राज्यसभेत लावली. त्यामुळे लोकसभेत जिंकल्या नसल्या तरीही त्या राज्यसभेतून खासदार झाल्या अन् संसदेत गेल्या. दरम्यान, राज्यसभेत निवड होताच त्यांना मिळालेल्या बंगल्यावरूनही मोठी चर्चा रंगली होती.

जनपथ मार्गावरील बंगल्याची चर्चा

खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जनपथ मार्गावरील ११ क्रमाकांचा बंगला देण्यात आला आहे. याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थाने आहेत. सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमाकांचा दर्जा असलेला टाइप ७ प्रकाराचा बंगला देण्यात आला असून हा बंगला शरद पवार यांच्या ६ जनपथ या बंगल्याच्या समोर आहे. शरद पवार हे टाइप ८ दर्जाच्या बंगल्यात सध्या राहत असून त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेही याच बंगल्यात राहतात.