देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींवर काँग्रेसह विरोधकांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्राविषयी केलेल्या वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे. लॉकडाउनचा निर्णय घेण्याबाबत पंतप्रधान मोदींनी नंतर बघू म्हणाले होते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“कोण कोविड सुपर स्पेडर आहे याचे प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे. लॉकडाउनच्या आधी लोकसभेचे कामकाज सुरु होते. त्यावेळी तृणमूलचे खासदार सौगता रॉय संसद सुरू असताना स्वतः पंतप्रधानांकडे चालत गेले आणि कोविड पसरत असल्याने कामकाज लवकर संपवले पाहिजे असे सगळ्यांचे मत आहे, असे म्हटले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी काय करायचे ते नंतर बघू असे म्हणाले. कारण मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यात हे सगळे व्यस्त होते,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
“कोविड काळात लोकांना अनोखळी असतानाही लोकांना मदत केली. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर मी नाराज नाही तर हैराण आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना सुपर स्प्रेडर असल्याचे कसे म्हणालात. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आरोप केला असता तरी मी तो कबुल केला असता. मी महाराष्ट्राची मुलगी म्हणून पंतप्रधानांकडे न्याय मागत आहे,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, “पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण करोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या. राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे,” असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.