महिला आरक्षण विधेयकाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारनं हे विधेयक मांडलं आणि त्यावर सध्या चर्चा चालू आहे. याआधीच केंद्रीय मंत्रीमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे. सध्या दोन्ही बाजूचे खासदार या विधेयकावर आपली भूमिका मांडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणादरम्यान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या एका उल्लेखावर तीव्र आक्षेप घेत त्यावरून ताशेरे ओढले.
“मी नेहमी सांगते की महिलांप्रमाणेच पुरुषही कुटुंबात तेवढेच महत्त्वाचे असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजीव गांधी, शरद पवार या पुरुषांचा माझ्यावर प्रभाव राहिला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पंचायतींमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू झालं”, असं सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.
“माझ्या वडिलांनी एकच अट घातली होती…”
“सुदैवाने मी मोकळ्या विचारांच्या कुटुंबात जन्माला आले. माझ्या वडिलांनी माझ्या आईला फक्त एक अट घातली. ते म्हणाले, जर आपल्याला मूल झालं, तर तो मुलगा असला किंवा मुलगी असली, तरी आपण एकपेक्षा जास्त मूल होऊ द्यायचं नाही. मानसिकतेतील असे मोठे बदल आपल्या देशात घडत आहेत”, असं सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सांगितलं.
निशिकांत दुबेंच्या टीकेचा समाचार
दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. “निशिकांत दुबे म्हणाले की ‘इंडिया’ आघाडी या चर्चेत अशा लोकांच्या बाजूला आहे ज्यांनी महिलांना कमी लेखलं आणि अपमानास्पद वागणूक दिली. पण मागे एकदा भाजपाच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी मला टीव्हीवर ऑन रेकॉर्ड जाहीरपणे सांगितलं की ‘सुप्रिया सुळे, घरी जा आणि जेवण बनवा. देश दुसरं कुणी चालवेल, आम्ही चालवू’. ही भाजपाची मानसिकता आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
“भाजपाच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने माझ्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले. त्यामुळे भाजपानं उत्तर द्यावं. आमच्याकडून कुणी काही बोललं तर ‘इंडिया’ वाईट आहे. तुमचे मंत्री वैयक्तिक टिप्पणी करतात, निवडून आलेल्या महिला सदस्यांबाबत बोलतात त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. मी यावर बोललेही नसते. पण त्यांनी मुद्दा उपस्थित केला म्हणून मी फक्त त्यावर प्रश्न केला. तुम्ही केलं तर बरोबर आणि आम्ही केलं तर चूक असं असू शकत नाही. नियम सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत”, असंही सुप्रिया सुळेंनी भाजपाला सुनावलं.
नेमकं काय घडलं होतं?
सुप्रिया सुळेंनी गेल्या वर्षी घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भ दिला होता. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वाहिनीवर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हे विधान केलं होतं. “कशासाठी राजकारणात राहाता. घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही? कळत नाही? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची? आता घरी जायची वेळ झाली आहे. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.