नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेच्या या यात्रेला विरोधी पक्षांनाही पाठिंबा मिळू लागल्याचे दिसू लागले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकमध्ये असून ९ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. राज्यात १७ दिवसांच्या प्रवासानंतर ती मध्य प्रदेशात जाईल. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३८० किमीची पदयात्रा केली जाणार असून राहुल गांधी यांचे १० जाहीर कार्यक्रम होणार आहेत.

‘भारत जोडो’ यात्रा तमिळनाडूमध्ये कन्याकुमारीपासून सुरू झाली होती व मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह ‘द्रमूक’चे अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीतील  ‘द्रमूक’ने ‘भारत जोडो’ यात्रेला जाहीर पािठबा दिला होता. महाराष्ट्रात कदाचित ‘यूपीए’तील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचाही पािठबा मिळण्याची शक्यता आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ‘यूपीए’तील घटक पक्षांना वा विरोधी पक्षांना नव्हे तर, काँग्रेसला मजबूत करण्यासाठी होत असल्याची आक्रमक भूमिका पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी घेतली होती. आता मात्र, काँग्रेसने मित्र पक्षांशी जुळवून घेतल्याचे दिसत आहे.