पंतप्रधानांना थेट विष्णूचा ११वा अवतार संबोधण्यापर्यंत त्यांच्या भक्तांची मजल गेल्याचे सांगत भाजपाचे नेते अशा विधानांमधून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आपल्या जवाब दो मोहिमेअंतर्गत ट्विटवरून पक्षाच्या अधिकृत अकाऊण्टबरोबरच अनेक नेत्यांनी यासंदर्भातील ट्विट केले आहे.

सोशल मिडियावर राष्ट्रवादीने सुरु केलेल्या जवाब दो मोहिमेमध्ये आज ४३ वा प्रश्न म्हणून भाजपामधील वाचळवीरांना लक्ष्य करण्यात आले आहे. ३० सेकंदांच्या एका व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाच्या वाचळ नेत्यांची उदाहरणे देत राष्ट्रवादीने मोदी सरकारच्या काळात किती वैज्ञानिक प्रयोगांना चालना मिळाली असा सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, मध्य प्रदेशचे भाजपा आमदार गोपाल परमार, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह, राजस्थानातील अलवर येथील भाजपा आमदार ज्ञान देव आहुजा, भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल या सर्वांच्या वक्तव्यांचा समावेश या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता.

‘पंतप्रधानांना थेट विष्णूचा ११वा अवतार संबोधण्यापर्यंत त्यांच्या भक्तांची मजल गेली. भाजप नेत्यांनी या आधीही अवैज्ञानिक विधाने करून लोकांची दिशाभूल केली आहे. डिजीटल इंडियाचा नारा देणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात किती वैज्ञानिक प्रयोगांना चालना मिळाली?’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारतात पुरातनकाळी जेनेटिक्स सायन्स अस्तित्वात होते असे मत पंतप्रधान मोदींनी नोंदवले होते. तर महाभारत काळापासूनच इंटरनेट होते असा दावा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केला होता. ‘बालविवाहामुळे ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल असे विधान मध्य प्रदेशचे भाजपा आमदार गोपाल परमार यांनी केले होते. ‘माकड पूर्वज नव्हते, डार्विनचा सिद्धांत खोटाच असल्याचा दावा सत्यपाल सिंह यांनी केला होता. तर भगवान हनुमान हे जगातील पहिले आदिवासी होते असा दावा ज्ञान देव आहुजा यांनी केला होता. समलैंगिकता एक जेनेटिक डीसऑर्डर असल्याचे मत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले होते. तर रमेश पोखरियाल यांनी हजारो वर्षांपूर्वीच भारतात अणूचाचणी घेण्यात आल्याचा दावा केला होता. या सर्व वक्तव्यांच्या बातम्यांचे फोटोंचा या व्हिडीओमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader