Sharad Pawar NCP On Adani Issue : संसदेचे हिवाळी अधिवेशन काँग्रेसणे अदाणींच्या मु्द्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र यामध्ये काँग्रेस पक्षाच्या इतर सहकाऱ्यांनी मात्र साथ सोडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने देखील शुक्रवारी कोणत्या उद्योगपतीचे कोणाशी संबंध आहेत यापेक्षा जर शेतकरी आणि तरूणांच्या मुद्द्यावर चर्चा केली तर संसदेच्या वेळेचा चांगला उपयोग होईल असे म्हटले आहे.
काँग्रेसचे इंडिया आघाडीतील इतर सहकारी पक्ष – तृणमूल काँग्रेस (TMC), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि समाजवादी पक्ष (SP) यांनीही या मुद्द्यापासून अंतर राखले आहेत. फक्त काँग्रेसच संसदेत या अदाणींच्या मुद्द्यावर दररोज आंदोलन करत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने तर उघडपणे गौतम अदाणी यांच्या चौकशीच्या मुद्द्यापेक्षा इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अंग काढून घेतल्याने काँग्रेसकडे अदाणींचा मुद्दा सोडून देण्यासाठी दबाव वाढला आहे.
लोकसभेत संविधान स्वीकारल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “संविधानाने संसदेला घटनात्मक व्यवस्थेत प्रमुख स्थान दिले आहे. दुर्दैवाने, बऱ्याचदा आपण त्याचे राजकीय रणांगणात रूपांतर झाल्याते अनुभवतो. वैयक्तिक टिप्पणी केल्याने बऱ्याचदा संसदेचं कामकाज थांबवलं जातं. कोणत्या राजकीय नेत्याचे उद्योगांशी संबंध आहेत, कोणता नेता कोणाच्या विमानात कुठे गेला किंवा कोणत्या परदेशातील नेत्याने स्थानिक नेत्याला देणगी दिली यापेक्षा आपल्या शेतकरी आणि तरूणांचे मुद्दे उपस्थित केले जाता आहेत की नाही याची काळजी आपल्याला असली पाहिजे. आम्हाला देशासाठी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा हवी आहे, राजकीय घोषणा नको आहेत. सरकार आणि विरोधक या दोन्हीनी हे लक्षात घेतले पाहिजे”. पुढे कोल्हे यांनी शेतकर्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत कशी मिळाली पाहिजे आणि तरूणांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध झाल्या पाहिजेत याबद्दल देखील भाष्य केले.
पवारांकडून यापूर्वीही अदाणींचा बचाव
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, पाच वर्षांपूर्वी अदाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या हे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या चर्चेमध्ये सहभागी होते. ही गोष्ट २०१९ सालची आहे. जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीच्या विजयानंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
या घटनेबद्दल बोलताना अजित पवार यांनी द न्यूज मिनिट आणि न्यूजलँड्रीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, “सर्वांना माहिती आहे की ही बैठक कुठे झाली… प्रत्येकजण तिथे होता. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. अमित शहा, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार , पवार साहेब (शरद पवार) होते.”
शरद पवारांनी माध्यमांना सांगितले की, भाजपाच्या नेत्यांना अदाणी यांच्या घरी भेटण्यासाठी ते तयार झाले कारण पक्षातील सहकारी त्यांच्यावरील खटल्यांबद्दल चिंतेत होते आणि भाजपाबरोबर गेल्याशिवाय सुटकेचा दुसरा पर्याय नाही असे त्यांना वाटत होते. मी चर्चेवर विश्वास ठेवतो असेही शरद पवार म्हणाले होते.
काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांना घेऊन २०२२ मध्ये अजित पवार एनडीएमध्ये सहभागी झाले आणि भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेशी हातमिळवणी करत महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले. नुकतेच या तीन पक्षाच्या महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २३० हून अधिक जागा जिंकत विजय मिळवला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेल्या आरोपांमुळे भारताच्या राजकीय वर्तुळात हादरून गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीच्या मागणीने जोर धरला, त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसहून वेगळी भूमिका घेतली आणि अदाणी समूहाला अज्ञातांकडून लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले.
अदाणी समूदाची भागीदारी असलेल्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या जेपीसी चौकशीची मागणी पासून स्वत:ला दूर ठेवले आणि या प्रकरणावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांकडून संसद ठप्प करण्याशी ते सहमत नसल्याचेही सांगितले.
टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपा आणि काँग्रेस दोन पक्षांना संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले. त्यांनी अदाणींच्या मुद्द्यावर अडकलेल्या काँग्रेसवर टीका केली.