पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर केलेल्या भाषणात विरोधकांना लक्ष्य केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करताना त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवरही तोंडसुख घेतलं. या पार्श्वभूमीवर विरोधी बाकांवर बसलेल्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. शरद पवार यांनी संध्याकाळी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत यासंदर्बात आपली भूमिका मांडली. पंतप्रधानांनी देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधानांविषयी अशा पद्धतीने बोलायला नको होतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
एकीकडे शरद पवार राष्ट्रवादी पक्षनाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत भूमिका मांडणार असं वाटत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत केलेल्या भाषणाबाबत भूमिका मांडली. “पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर मला फार दु:ख झालं. पंतप्रधान संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात. कोणत्या एका पक्षाचे पंतप्रधान नसतात. पण त्यांनी आज देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या साथीदारांनी आयुष्याचा मोठा काळ तुरुंगात घालवला, त्या महान नेत्यांपैकी एक जवाहरलाल नेहरू होते”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
“नेहरू देशाला लोकशाहीच्या मार्गावर घेऊन गेले”
“स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं, त्यात आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांनी केलेलं सर्वात मोठं काम म्हणजे स्वातंत्र्यानंतर ते या देशाला लोकशाहीच्या मार्गावर घेऊन गेले. देशात आज जी लोकशाही आपण पाहातो, तिची सुरुवात, तिला ताकद देण्याचं काम जवाहरलाल नेहरूंनी केलं. विज्ञान, तंत्रज्ञानावर त्यांनी विशेष लक्ष दिलं. देशातील अनेक मोठे सिंचन प्रकल्प, विकास प्रकल्प यावर काम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात लोक पुढे येत नव्हते. शेवटी सरकारनं पुढाकार घेऊन देशात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे सुरू करण्याचं काम केलं”, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्याचा गौरव केला.
“मोदींनी आज नेहरूंवर केलेली टीका योग्य नाही. राजकारणात वेगवेगळ्या विचारसरणी असतात. पण ज्यांनी देशासाठी काम केलं, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काही ना काही चांगलं काम केलं आहे. याकडे आपण लक्ष द्यायला हवं. पण पंतप्रधान याकडे लक्ष देत नाहीत. पण ठीक आहे. त्यांनी चुकीच्या मार्गाचा स्वीकार केला आहे. मला विश्वास आहे, की देशातली नवीन पिढी इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर ठेवण्याचं काम करणाऱ्या विचारसरणीला लांब ठेवण्याचं काम करेल”, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.