देशभरात हळूहळू वाढू लागलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असताना रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे त्याचा अजूनच भडका उडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती देखील वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक जुन्हा व्हिडीओ ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असतानाचा आहे.
“भूतकाळातले शब्द…”
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भातलं ट्वीट केलं आहे. या व्हिडीओसोबत टाकलेल्या कॅप्शनमधून राष्ट्रवादीनं मोदींवर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर निशाणा साधला आहे. “पूर्वाश्रमीच्या पक्षात असताना पंतप्रधान मोदींवर खुलेआम टीका केली. वेळप्रसंगी पंतप्रधानांची नक्कलही केली. आता काळ बदलला.. सिंधियाजींनी पक्ष बदलला आणि सोबतच आपली भूमिकाही बदलली… मात्र भूतकाळातले शब्द आजही खरे ठरत आहेत”, असं ट्वीट राष्ट्रवादीकडून करण्यात आलं आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करताना दिसत आहेत. तसेच, मोदी सरकारवर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर टीका करताना देखील दिसत आहेत. तसेच, “मोदीजींच्या हवाई उड्डाणाचे यात्री झाल्यावर ज्योतिरादित्य शिंदेंना जमिनीवरच्या नागरिकांचे हाल दिसेनासे झाले”, असं देखील या व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे.
“पेट्रोलच्या किंमती बुलेटप्रमाणे आकाशात”
ज्योतिरादित्य शिंदे मोदींची नक्कल करत म्हणतात, “बंधु आणि भगिनींनो.. सांगा.. पेट्रोलच्या किमती कमी व्हायला हव्यात की नको? गॅसच्या किमती कमी व्हायला हव्यात की नको? डिझेलच्या किमती कमी व्हायला हव्यात की नको? डिझेलच्या किमती कमी व्हायला हव्यात की नको?” पुढे पेट्रोलच्या किमतींविषयी बोलताना ते म्हणतात, “यांच्या सरकारने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन आणण्याचा निर्णय घेतला होता. बुलेट ट्रेन तर आली नाही, पण पेट्रोलच्या किमती बुलेटप्रमाणे आकाशात पोहोचल्या आहेत. एलपीजीच्या किमती यूपीएच्या काळात ४०० रुपये होत्या, आता त्या १२०० रुपये झाल्या आहेत. हे म्हणायचे, मनमोहन सिंगजी, तुम्ही रुपयाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलंत. मी सांगतो, मोदीजी, तुम्ही तर रुपयाला स्मशानभूमीतच पोहोचवलंत”, असं शिंदे या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.