दरवर्षी National Crime Record Bureau अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून देशातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करणारा अहवाल तयार केला जातो. २०२० या वर्षासाठीचा हा अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये अर्थात करोनाच्या काळात महिलांविरोधातील नोंद गुन्ह्यांचं प्रमाण ८.३ टक्क्यांनी घटलं आहे. मात्र, असं असलं, तरी याच काळात पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये मात्र हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. तसेच, देशभरातील आकडेवारीमध्ये सर्वाधिक प्रमाण पती किंवा इतर कुटुंबीयांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचं असल्याचं देखील या आकडेवारीवरून समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजधानी दिल्लीमध्ये गुन्ह्यांमध्ये घट

मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या (NCRB Report) अहवालानुसार २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये महिलांविरोधात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ८.३ टक्के घट झाल्याचं दिसून आलं आहे. २०१९मध्ये हा आकडा ४ लाख ५ हजार ३२६ इतका होता, २०२०मध्ये तो ३ लाख ७१ हजार ५०३ इतका खाली आला आहे. मात्र, असं असताना पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये हे प्रमाण आधीच्या वर्षाच्या तुलनेत वाढलं आहे.

त्याउलट देशाची राजधानी दिल्लीमध्ये महिलांविरोधातील नोंद गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत आहे. दिल्लीत २०१९मध्ये १३ हजार ३९५ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२०मध्ये ती १० हजार ०९३ इतकी खाली आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील हे प्रमाण ५९ हजार ८५३ वरून ४९ हजार ३८५ इतकं खाली आलं आहे. त्यामुळे करोना काळात महिलांविरोधात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांचं सरासरी प्रमाण घटल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वाधिक गुन्हे पती, कुटुंबीयांकडून होणाऱ्या अत्याचारांचे

दरम्यान, असं असलं, तरी नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधित ३० टक्के इतकं प्रमाण हे पती आणि कुटुंबीयांकडून होणाऱ्या अत्याचारांचं आहे. त्यापाठोपाठ महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने त्यांच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण हे २३ टक्के इतकं आहे. तर महिलांच्या अपहरणाची एकूण गुन्ह्यांपैकी टक्केवारी १६.८ टक्के आहे. विशेष म्हणजे, या आकडेवारीमध्ये सर्वात कमी प्रमाण हे बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदींचं असून ते ७.५ टक्क्यांवर आहे.

२०२०मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या नोंद झालेल्या ३ लाख ७१ हजार ५०३ प्रकरणांपैकी ३५ हजार ३३१ प्रकरणं ही देशातील मोठ्या शहरांमध्ये घडलेली आहेत. हे प्रमाण देखील २०१९ च्या तुलनेत २१.१ टक्क्यांनी घटल्याचं दिसून आलं आहे. देशात करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पूर्णपणे लॉकडाउन लागू असल्यामुळे ही घटलेली आकडेवारी दिसून येत असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncrb report 2020 reveals decrease in crime against women overall increase in uttar pradesh pmw