येत्या वर्षभरात उत्तर प्रदेश या देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उत्तर प्रदेश आपल्याच हाती कायम ठेवण्यासाठी भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण कमी झालेलं नसून वाढलं असल्याचं समोर आलं आहे. या अहवालामध्ये त्यासंदर्भातली आकडेवारीच देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीची परिस्थिती…
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (NCRB) नं २०२० सालासाठीचा गुन्हे नोंदणी अहवाल १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. या अहवालामध्ये देशभरातील गुन्हे नोंदणीची परिस्थिती मांडण्यात आली आहे. यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये २०१८ सालापासूनच एकूण गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. २०१८मध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकूण ३ लाख ४२ हजार ३५५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१९मध्ये हाच आकडा ३ लाख ५३ हजार १३१ इतका वाढला, तर २०२०मध्ये जेव्हा देशभरातील एकूण गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं असताना उत्तर प्रदेशात देखील ३ लाख ५५ हजार ११० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
देशभरातील गुन्हेगारीचं प्रमाण २० टक्क्यांनी वाढलं!
दरम्यान, देशभरातल्या आकडेवारीचा विचार करता एकूण प्रमाण २०१९ च्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांनी वाढलं आहे. २०१९मध्ये देशभरात ५१ लाख ५६ हजार १५८ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तो आकडा २०२०मध्ये तब्बल ६६ लाख १ हजार २८५ इतका वर गेला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचं पालन न केल्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण यात जास्त आहे. करोना काळात सरकारतर्फे घालून दिलेल्या नियमावलीचं पालन न केलेल्या नागरिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळेही हा आकडा वाढला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये २०१९मधील २९ हजार ४६९ वरून हा आकडा २०२०मध्ये ६ लाख १२ हजार १७९ इतका जास्त वाढला आहे.
२० मार्च २०२१ रोजी उत्तर प्रदेशच्या पोलीस दलाकडून राज्यातील गुन्हेगारीमध्ये गेल्या ४ वर्षांत मोठी घट झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, १ ऑगस्ट रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील लखनौ आणि मिर्झापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं.