संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्यावरील टीकेप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. राफेल प्रकरणात मोदींनी पळ काढला आणि एका महिलेला म्हणजेच निर्मला सीतारमन यांना स्वत:च्या रक्षणासाठी मैदानात उतरवले, असे विधान त्यांनी केले होते.

महिला आयोगाने गुरुवारी राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यात म्हटले आहे की, तुम्ही एका महिलेविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल प्रकरणात पळ काढला आणि एका महिलेला (संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन) स्वत:चे रक्षण करायला सांगितले. तसंच पुढे तुम्ही हे देखील म्हणाला की, मर्द व्हा आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या. तुमच्या या विधानातून महिलेचा अनादर केल्याचे दिसते.

महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने महिलेसंदर्भात बेजबाबदार विधान करणे अयोग्य असल्याचे महिला आयोगाला वाटते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता नोटीस मिळाल्यावर तुम्ही महिला आयोगासमोर स्पष्टीकरण द्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी राजस्थानमधील एका मेळाव्यात राफेल प्रकरणाचा दाखला देत मोदींवर टीका केली होती. ‘५६ इंचाची छाती असलेला चौकीदार पळून गेला आणि एक महिला- निर्मला सीतारमन यांना सांगितले की आता तुम्हीच मला वाचवा. मी आता स्वत:ला वाचवू शकत नाही’, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.

Story img Loader