मागील वर्षी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला २३९ जागांवरच समाधान मानावं लागलं. एनडीएतील घटक पक्षांच्या साथीने भाजपा सत्तेत आहे. मात्र एका सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा एनडीए ३०० पार जाईल. एनडीए आणि भाजपासाठी तो झटका मानला गेला होता यात शंकाच नाही. मात्र त्यानंतर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र आणि नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी केल्याचं दिसलं. महाराष्ट्रात तर महायुतीला २३७ जागा मिळाल्या. २८८ पैकी २३७ जागा एखाद्या युतीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दिल्लीतही भाजपाने ७० पैकी ४८ जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. इंडिया टुडे सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक पार पडली तर भाजपा आणि एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा सर्व्हे काय सांगतो?
इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटर्स ने मूड ऑफ द नेशन हा सर्व्हे केला. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपा एनडीएला ३४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार भाजपाला २८१ जागा तर काँग्रेसला फक्त ७८ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक झाली तेव्हा निकालात काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या होत्या ज्या या सर्व्हेनुसार कमी झालेल्या दिसत आहेत. इंडिया आघाडीला १८८ जागा मिळतील असाही अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती?
इंडिया टुडे, सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार पंतप्रधान म्हणून ५१ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर २४.९ टक्के लोकांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली आहे. तर १.२ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली आहे. या सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक पार पडली तर इंडिया आघाडीला ४० टक्के मतं मिळतील आणि ४६.९ टक्के मतं एनडीएला मिळतील.
उत्कृष्ट कामगिरी करणारे पंतप्रधान म्हणून मोदींना सर्वाधिक पसंती
आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणारे पंतप्रधान कोण? असा प्रश्न या सर्व्हेत विचारला गेला. ५०. ७ टक्के लोकांनी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर ५.२ टक्के लोकांनी पंडित नेहरु हे देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान होते असं म्हटलं आहे.