गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने प्रचारप्रमुख केल्याने संतापलेल्या संयुक्त जनता दलाने भाजपबरोबर युतीच्या भवितव्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. याबाबत १४ जूननंतर निर्णय अपेक्षित आहे, मात्र जनता दल भाजपबरोबर राहणे कठीण असल्याचे सांगत मैत्री संपुष्टात येण्याचे स्पष्ट संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सध्या सेवा यात्रेच्या माध्यमातून दौऱ्यावर आहेत. त्यांच्या यात्रेनंतर म्हणजे १४ जूननंतर याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. युती तोडण्याचा निर्णय जवळपास नक्की झाला असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे जनता दलातील सूत्रांनी सांगितले. जनता दलाने वेळोवेळी आक्षेप घेतल्यानंतरही मोदींना बढती देण्यात आली. आता तर पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केवळ बाकी असल्याची जनता दलाची भावना आहे. त्यामुळे युती टिकणे अशक्य आहे. या संदर्भात नितीशकुमार यांनी पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्यासह पक्षाच्या नेत्यांशी चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
भाजप-जनता दल मैत्रीचे दिवस संपलेले आहेत. याबाबत लवकरच मोठी घोषणा अपेक्षित असल्याचे जनता दलाच्या नेत्यांनी पाटण्यात स्पष्ट केले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी नरेंद्र मोदींवर केलेली टीका पाहता युतीचे भवितव्य कठीण असल्याचे उघड आहे. मोदी हे विभाजनवादी व्यक्तिमत्त्व असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित स्मारकाबाबत त्यांनी टीकास्त्र सोडले.
बिहार सरकारचे भवितव्य
युती संपुष्टात आली तर बिहार सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीने जनता दलाचे नेते सहा अपक्षांच्या संपर्कात आहेत. २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत जनता दलाचे ११८ सदस्य आहेत, तर भाजपचे ९१ सदस्य आहेत. बहुमतासाठी भाजपच्या मदतीशिवाय त्यांना चार सदस्यांची गरज आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व नसेल तर आम्हाला रालोआमध्ये राहणे अवघड आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावर आम्ही तडजोड करणार नाही, असे संयुक्त जनता दलाचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनीही स्पष्ट केल्याने एनडीएमधील फूट अटळ मानली जात आहे. मोदी यांना बढती दिल्यानंतर जनता दल युनायटेडने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रहाची मागणी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने केली होती.