परदेशातील एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीयांची संख्या तब्बल ११९५ असून या खातेधारकांच्या खात्यांमध्ये तब्बल २५ हजार ४२० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. परदेशातील पैशाबाबत माहिती मिळत नसल्याचे कारण पुढे करून केंद्र सरकार त्याबाबत चालढकल करीत होते. आता खातेधारकांची नवी यादी मिळाली असल्यामुळे परदेशी बॅंकांतील पैशाबाबत कारवाईसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. या स्विसलीक्सची केंद्राने गंभीर दखल घेतली असून, या नव्या यादीची चौकशी करण्यासाठी काळ्या पैशासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) व्याप्ती वाढविण्यात येईल. तसेच ज्या जागल्याने (व्हीसलब्लोअर) ही यादी मिळवून ती जाहीर केली, त्याच्या संपर्कात आम्ही आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
स्विसलीक्सच्या या माहितीत नवी नावे आली आहेत. विशेष म्हणजे २०११ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांच्याकडील भारतीय खातेधारकांची यादी भारताला सुपूर्द केली होती. त्यात फक्त ६२८ जणांचीच नावे आहेत. या पाश्र्वभूमीवर खातेधारकांची संख्या ११९५ म्हणजे दुप्पट झाल्याचे दिसून येते. खातेधारकांमध्ये काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नारायण राणे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांचीही नावे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परदेशातील बँकांमध्ये पसा ठेवणारे भारतीय किती आहेत, हे शोधण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ने तीन महिन्यांची मोहीम राबविली. यासाठी वॉिशग्टनस्थित ‘इंटरनॅशनल कॉन्सॉर्टयिम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट’ (आयसीआयजे) आणि पॅरिसस्थित ‘ला माँड’ या दैनिकाची मदत घेतली. या यादीमध्ये देशातील नामांकित उद्योगपती, हिरेव्यापारी, राजकारणी आणि अनिवासी भारतीय यांचा समावेश आहे. देशातील मोठय़ा उद्योगपतींची एचएसबीसीमध्ये खाती आहेत. त्यामध्ये मुकेश अंबानी, अनिल अंबानी, आनंदचंद बर्मन, राजन नंदा, यशोवर्धन बिर्ला, चंद्रू लच्छमदास रहेजा, दत्तराज साळगावकर, भद्रश्याम कोठारी आणि श्रावण गुप्ता यांचा समावेश आहे. राज्याचे माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कुटुंबीयांचीही नावेही या यादीमध्ये आहेत. राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नीलेश राणे यांचा यामध्ये समावेश आहे. त्याबरोबरच सून स्मिता ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांच्या कुटुंबीयांची नावेही यादीमध्ये आहेत. केंद्रातील गेल्या यूपीए सरकारमधील मंत्री प्रणीत कौर आणि काँग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन यांचेही नाव यादीमध्ये असल्याचे आढळले. दरम्यान, मुकेश आणि अनिल अंबानी, नरेश गोयल तसेच नारायण राणे यांनी बेकायदा खाती असल्याचा इन्कार केला आहे. विशेष म्हणजे राजकारणाशी संबंधित खातेधारकांची संख्या कमी असल्याचे दिसून आले.
देशातील मोठय़ा हिरेव्यापाऱ्यांची नावेही या यादीमध्ये आहेत. त्यापकी बरेच जण परदेशांमध्ये स्थायिक झाले आहेत. एचएसबीसीमध्ये खात्यांवर यापकी अनेकांचे पत्ते मुंबईतील आहेत. त्यामध्ये रसेल मेहता, अनुप मेहता, सौनक पारिख, चेतन मेहता, गोिवदभाई काकडिया आणि कुणाल शहा यांचा समावेश आहे. स्वराज पॉल, मनू छाब्रिया यांचे कुटुंबीय, राजेंद्र रुईया आणि विमल रुईया आणि नरेशकुमार गोयल या प्रमुख अनिवासी भारतीयांची नावेही या यादीमध्ये आहेत. एचएसबीसीकडे असलेल्या भारतीय खातेधारकांपकी २७६ खातेधारकांच्या खात्यांमध्ये दहा लाख डॉलरची माया आहे. यापकी ८५ खातेदार हे देशात राहात असल्याचेही आढळले आहे.
दरम्यान, काळ्या पैशाबाबत माहितीची देवाण-घेवाण व्हावी याबाबत स्वित्र्झलड सरकारला प्रस्ताव दिला आहे, असे जेटली यांनी सांगितले. विशेष तपास पथकाचीही सोमवारी बैठक घेण्यात आली. या तपास पथकाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे पथकाचे उपाध्यक्ष अरिजित पसायत यांनी सांगितले.
कारवाईसाठी सरकारवर दबाव
परदेशातील एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीयांची संख्या तब्बल ११९५ असून या खातेधारकांच्या खात्यांमध्ये तब्बल २५ हजार ४२० कोटी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-02-2015 at 02:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nda government under pressure for taking action against black money holders