राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पक्षावर देशाचे विभाजन करण्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर काँग्रेस आणि यूपीएविरोधात चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. “राज्यसभेतील त्यांचे संपूर्ण भाषण केवळ काँग्रेसवर टीका करण्यावर केंद्रीत होते. पण त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक विषमातेबाबत भाष्य केलं नाही”, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “दोन्ही सभागृहातील भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसवरच निशाणा साधला. गेली १० वर्षे ते केंद्रात आहेत, पण त्यावर बोलण्याऐवजी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करणेच योग्य मानलं. सभागृहात ते ना जनमताच्या मुद्द्यांवर बोलले ना महागाई आणि बेरोजगारीवर. मी तुम्हाला सांगतो की NDA चा अर्थ ‘NO DATA AVAILABLE असा आहे. त्यांच्याकडे ना रोजगार डेटा आहे, ना त्यांच्याकडे आरोग्य सर्वेक्षण डेटा आहे. याचे कारण सरकार सर्व डेटा लपवते आणि खोटे पसरवते. मोदींची हमी फक्त खोटेपणा पसरवण्यासाठी आहे. त्यांनी दोन्ही सभागृहात यूपीए सरकारबद्दल खोटे पसरवले.”
पंतप्रधान मोदी फक्त UPA बद्दल खोटे बोलत आहेत – खर्गे
केंद्र सरकार आणि मोदींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, UPA सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर २.२ टक्के होता. मात्र त्यांच्या कार्यकाळात तो ४५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. यूपीएच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत सरासरी जीडीपी वाढीचा दर ८.१३ टक्के होता आणि सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात तो केवळ ५.६ टक्के का आहे? जागतिक बँकेच्या मते, २०११ मध्येच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. यूपीएच्या कार्यकाळात १४ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. पण पंतप्रधान मोदी हे सांगणार नाहीत, कारण ते फक्त भाषणातून खोटे बोलण्याचे काम करतात.
हेही वाचा >> “काँग्रेसची विचारधारा ‘आऊटडेटेड’, इतक्या मोठ्या पक्षाचं अधःपतन..”; राज्यसभेत मोदींची टोलेबाजी
मोदी काय म्हणाले होते?
“काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीची गळचेपी केली. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने आलेली सरकारं बरखास्त केली. काँग्रेसने देशाचं संविधान, मर्यादा पाळणाऱ्या लोकांना गजाआड केलं. काँग्रेसने वृत्तपत्रांचा गळा घोटला. काँग्रेस देश तोडण्याचे नॅरेटिव्ह रचत गेला. आता उत्तर आणि दक्षिण भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हा काँग्रेस पक्ष लोकशाही शिकवतोय, प्रवचनं देतोय. ज्या काँग्रेसने जात, पात आणि भाषा यांच्या नावे देश तोडला. दहशतवाद आणि फुटीरतावादाला जन्म घालणारे हेच लोक आहेत. देशाला ज्यांनी पिछाडीवर नेलं तो काँग्रेस आहे. काँग्रेस काळात नक्षलवाद मोठं आव्हान झाला. देशाची मोठी जमीन शत्रूच्या हाती सोपवली. आज ते आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा यावर भाषणं देतो आहे?” असा प्रश्न मोदी यांनी विचारला आहे.