संसदेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी संविधानाला नमन केलं. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. आज एनडीएच्या खासदारांची बैठक सेंट्रल हॉलमध्ये पार पडते आहे. या बैठकीत फिर एक बार एनडीए सरकार आणि फिर एक बार मोदी सरकार हे नारे देण्यात आले. तिसरी बार मोदी सरकार हा नाराही देण्यात आला.
जे. पी. नड्डा काय म्हणाले?
आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्यात उपस्थित आहेत. हे जे. पी. नड्डांनी म्हणतात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदी-मोदी हा गजर झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांपुढे उभं राहात हात जोडले. पुढे नड्डा म्हणाले, “एनडीएतल्या वरिष्ठ नेत्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करतो. तसंच सगळ्या खासदारांचंही मी अभिनंदन करतो. आजचा क्षण हा ऐतिहासिक आहे. आपण या क्षणाची वाट पाहात होतो तोच क्षण आहे. तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार येतं आहे. आपले नेते म्हणून आपण एकमुखाने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची निवड केली आहे.
आजचा क्षण ऐतिहासिक आहे
आजचा क्षण खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे. आपण या क्षणाचे साक्षीदार आहोत हे आपलं भाग्य आहे. कोट्यवधी जनतेच्या वतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतो.” असं जे. पी. नड्डांनी म्हटलं आहे. एनडीएने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे याचा मला आनंद वाटतो, आंध्र प्रदेशात एनडीएचं सरकार आलं आहे. तसंच ओदिशातही आपली सत्ता आली आहे. अरुणाचल प्रदेशात सलग तिसऱ्यांदा आपली सत्ता आली आहे. याचा विशेष आनंद मला वाटतो आहे असंही नड्डा म्हणाले.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून मांडला. या नावाला सगळ्यांनीच संबोधन दिलं. मोदी मोदी असा गजर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पुन्हा एकदा पार पडला. तसंच १९६२ नंतर मोदी असे एकमेव नेते आहेत ज्यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान होता आलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. देशानेच त्यांना सेवा करण्यासाठी पुन्हा निवडलं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह काय म्हणाले?
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. ही भारतासाठी एक गौरवाची बाब आहे. १९६२ पासून हे पहिल्यांदा घडलं आहे. राजनाथ सिंह यांनी जे प्रस्ताव ठेवले त्याला पाठिंबा देतो आहे असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच फिर एक बार मोदी सरकार असंही ते म्हणाले. यानंतर नितीन गडकरींनीही प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
नितीन गडकरी काय म्हणाले?
“संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपाचे नेते, लोकसभेचे नेते आणि एनडीएचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदींचं नाव प्रस्तावित केलं आहे. या प्रस्तावाला मी मंजुरी देतो आहे. आपला देश महाशक्ती झाला पाहिजे, यासाठी समर्पित भाव मनात ठेवत नरेंद्र मोदी काम करत आहेत. फक्त देशातच तर त्यांच्या नेतृत्वाची भुरळ सगळ्या जगाला पडली आहे. दहा वर्षांत जे काम झालं ती सुरुवात होती. आता येत्या पाच वर्षांत आपण जगातली महान ताकद होऊ, असा मला विश्वास आहे.” असं नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरींच्या भाषणानंतर कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनीही छोटीशी भाषणं करत नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या नावाला अनुमोदन देत प्रस्तावाला मान्यता दिली.
नितीश कुमार काय म्हणाले आहेत?
“आमचा पक्ष नरेंद्र मोदींना समर्थन देतो आहे. खूप आनंद आम्हाला वाटतो आहे, तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होत आहेत. याचा मला आनंद आहे. आम्ही सगळी पाच वर्षे त्यांच्या बरोबर आहे. यावेळी विरोधी पक्षातले काही लोक जिंकून आले आहेत. पण ते सगळे पुढच्या वेळी विरोधी पक्षातले सगळे हारतील याचा मला विश्वास आहे असं नितीशकुमार म्हणाले. पुढच्या टर्मला तुम्ही याल तेव्हा जास्त खासदार निवडून येतील असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागाल आम्ही पाठिंबा देऊ. आज एनडीएला बहुमत मिळालं आहे, आपण सगळे बरोबर चालणार आहोत. देशाला तुम्ही पुढे न्या असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यांचाही विकास तुम्ही कराल याचा विचार याची मला खात्री आहे. मी तुमचं अभिनंदन करतो. सगळे लोक तुमच्याच नेतृत्वात काम करतील याचा आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत” असं म्हणत नितीश कुमार यांनी खास शब्दांत मोदींना पाठिंबा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा शपथ घेणार आहे. एनडीएचे नेते म्हणून त्यांची निवड झाली हा भाग्याचा क्षण आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांना पाठिंबा देते आहे. आमचा पाठिंबा मोदींना आहे. मागच्या दहा वर्षांत देशाचा खूप विकास मोदींनी केला. देशाचं नाव जगभरात पोहचवलं. देशाची अनेक स्वप्नं त्यांनी पूर्ण केली आहेत. भ्रम पसरवून विरोधी पक्षांमधले लोक निवडून आले आहेत. मात्र मोदींची जादू कायम आहेत. तिसऱ्यांदा त्यांचा करीश्मा पाहिला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत या शुभेच्छा मी त्यांना देतो आहे. तसंच त्यांना पूर्ण पाठिंबा देतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.