पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लखनऊ विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हा करार उपयुक्त ठरणार असून, वैद्याकीय किंवा अन्य कारणास्तव एनडीएतून बाहेर पडणाऱ्या छात्रांना त्यांचे शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ शुक्रवारी झाला. लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आलोक कुमार राय यांच्या हस्ते छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली. एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, प्राचार्य ओ. पी. शुक्ला या वेळी उपस्थित होते. उत्तीर्ण झालेल्य ३५९ छात्रांपैकी २२२ छात्रांना जवारलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. त्यात ८३ छात्रांना विज्ञान शाखेची, ८५ छात्रांना संगणक शाखेची, ५४ छात्रांना मानव्यता शाखेची पदवी देण्यात आली. तसेच १५ परदेशी छात्रांनाही पदवी प्रदान करण्यात आली.

हेही वाचा >>>Sambhal Violence : संभल हिंसाचार प्रकरणी योगी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत; पुन्हा चौकाचौकात लागणार आंदोलनकर्त्यांचे पोस्टर्स?

कार्यक्रमात छात्रांना संबोधित करताना प्रा. राय यांनी लखनऊ विद्यापीठ आणि एनडीए यांच्यात सामंजस्य करार करण्यात येत असल्याची माहिती दिली. एनडीएतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएने अमृतरसरचे गुरुनानक देव विद्यापीठ, चेन्नईचे एसआरएम विद्यापीठ, हिमाचल प्रदेशातील महाराजा अग्रसेन विद्यापीठ अशा काही विद्यापीठांशी करार केला आहे.

एनडीएच्या धोरणानुसार प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्या छात्रांना वैद्याकीय किंवा दिव्यांग पेन्शनचा लाभ मिळत नाही. एनडीएमध्ये लिबरल आर्ट्स या पदवीसह विज्ञान, संगणकशास्त्र, तंत्रज्ञान या पदव्या दिल्या जातात.

हेही वाचा >>>Champions Trophy: “भारताने का जाऊ नये? जर पंतप्रधान मोदी…”, टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल तेजस्वी यादव स्पष्टच बोलले

सर्वोत्कृष्ट छात्रांना लष्करी सेवेची पार्श्वभूमी

कला शाखेत गुरकिरत सिंग, विज्ञान शाखेत युवराज सिंग चौहान, तंत्रज्ञान शाखेत सिद्धांत जाखर, संगणकशास्त्र शाखेत शशी शेखर सिंह या छात्राने प्रथम क्रमांक पटकावला. गुरकिरतचे वडील लष्करातून लान्स नायक पदावरून निवृत्त झाले तर युवराज सिंह चौहानचे वडील सध्या लष्करी सेवेत आहेत. नवी दिल्लीतील एअर फोर्स बालभारती स्कूलमध्ये शालेय शिक्षण झालेल्या सिद्धांतचे वडील हवाई दलातून निवृत्त झाले आहेत.शशी शेखर सिंगचे वडील शेतकरी आहेत, तर काका भारत-तिबेट सीमा पोलिसात (आयटीबीपी) कार्यरत आहेत.

श्रेयांक हस्तांतरणाचा लाभ

या कराराद्वारे वैद्याकीय कारणामुळे बाहेर पडणाऱ्या छात्रांना या शिक्षण संस्थांतून शिक्षण घेण्याची संधी मिळून शैक्षणिक नुकसान टाळता येते. एनडीएमध्ये उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांतून येणाऱ्या छात्रांची संख्या जास्त असल्याने लखनऊ विद्यापीठाशी होणारा करार अधिक उपयुक्त ठरणार आहे. लखनऊ विद्यापीठ मध्यवर्ती असल्याने श्रेयांक हस्तांतरणाचा लाभ घेऊन छात्रांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.