कॉंग्रेसच्या ‘गोंधळी’ खासदारांविरोधात देशव्यापी मोहीम उघडण्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ठरवले असून, त्याचाच एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात कॉंग्रेसचे ४४ खासदार निवडून आलेल्या लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली.
कॉंग्रेसच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन पाण्यात गेले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पूर्ण अधिवेशनात सुरळीतपणे कामकाज होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. एनडीएच्या खासदारांनी गुरुवारी दुपारी नवी दिल्लीत विजय चौक ते संसद असा मोर्चाही काढला. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जेटली म्हणाले, कॉंग्रेसचे ४४ आणि डाव्या पक्षांच्या ९ मतदारसंघांमध्ये २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. या सभेसाठी एक केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे चार खासदार जाणार असून, तेथे जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर देशव्यापी मोहीमही उघडण्यात येणार आहे. कोणत्याही दुसऱया सरकारला काम करू द्यायचे नाही, एवढेच कॉंग्रेसने ठरवले आहे, असाही आरोप त्यांनी केला.

Story img Loader