आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वेगळ्या तेलंगणाच्या विरोधात संपावर गेलेल्या ‘एनडीएमए’च्या आंध्र प्रदेशातील आंदोलक कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कामावर परतण्याचे आवाहन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे(एनडीएमए) उपाध्यक्ष शशिधर रेड्डी यांनी केले.
येत्या दोन दिवसांमध्ये आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आंध्रच्या शेजारील ओडिशालादेखील सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
सीमांध्र भागातील ‘एनडीएमए’चे कर्मचारी इतर शासकीय कर्मचाऱ्यांसोबत वेगळ्या तेलंगणाच्या विरोधामध्ये संपावर गेले आहेत. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या आंध्रच्या नागरिकांच्या व राज्य सरकारच्या संकटांमध्ये या चक्रीवादळामुळे अधिक भर पडण्याची शक्यता आहे.