अमेरिकेत पश्चिम टेक्सासमध्ये एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे जवळपास १८ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. सोमवारी टेक्सासच्या डिमिटमध्ये साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मोठा स्फोट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत १८ हजार गायी होरपळून मृत पावल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की जवळपास तासभर डेअरी फार्मवर आगीच्या ज्वाळा आणि काळाकुट्ट धूर पसरला होत्या. दरम्यान, या स्फोटामागेच कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अमेरिकेत डेअरी उत्पादनाला कृषी क्षेत्रात महत्त्वाचं स्थान आहे. त्यातच, अमेरिकेतील टेक्सासमध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८००० हजार गायींचा मृत्यू झाल्याने डेअरी फार्म मालकाची मोठ्या प्रमाणात वित्त आणि पशुहानी झालेली आहे. परंतु, या संदर्भात डेअरी फार्म मालकाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटामुळे फार्ममधील एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – कणेरी मठात ५० गाईंचा मृत्यू ; अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज, वार्ताकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण
९० टक्के गायींचा मृत्यू
स्फोटामागे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून डेअरी फार्ममध्ये असलेल्या एका उपकरणातील त्रुटींमुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज काऊंटी जज मैंडी गेफेलर यांनी वर्तवला आहे. दरम्यान, टेक्सासचे अग्निशमन विभागाचे अधिकारी या स्फोटामागचं कारण शोधत आहेत. होलस्टीन आणि जर्सी मिश्रीत प्रजातीच्या गायींचा या अपघातात मृत्यू झाला आहे. १८ हजार गायींच्या मृत्यूमुळे डेअरी फार्ममधील जवळपास ९० टक्के गायींचा होरपळून मृत्यू झाला आहे.
दूध काढण्यासाठी या गायींना एका गोशाळेत बांधण्यात आलं होतं. नेमका त्याचवेळी हा स्फोट झाला. गायींच्या मृत्यूमुळे कृषी क्षेत्रात मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कारण, या गायींचं मुल्य भारतीय चलनानुसार प्रत्येकी १ लाख ६३ हजार रुपये आहे.
साऊथ फोर्क डेअरी फार्म हे कॅस्ट्रो काऊंटी येथे असून हे टेक्सासमधील सर्वांत मोठ्या प्रमाणात डेअरी उत्पादन करणारी कंपनी आहे. टेक्सास डेअरी वार्षिक अहवाल २०२१ नुसार कॅस्ट्रो काऊंटीमध्ये जवळपास ३० हजार गायी आहेत. २०१३ मध्येही असाच मोठा अपघात घडला होता. त्यानंतर हा सर्वांत मोठा अपघात असल्याचं म्हटलं जातंय.