गेल्या काही दिवसांपासून फ्रान्सची राजधानी पॅरिस धगधगत आहे. अल्पवयीन १७ वर्षीय मुलावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. यानंतर नागरिक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. पॅरिसमधील अनेक ठिकाणी आंदोलन हिंसक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी १ हजारांहून नागरिकांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी ( २७ जून ) पॅरिसच्या उपनगरात वाहतूक नियम तोडल्याबद्दल पोलिसांनी १७ वर्षीय नाहेल. एम नावाच्या मुलावर गोळीबार केला होता. या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर फ्रान्समधील नागरिकांमध्ये तीव्र संताप उफाळला. फ्रान्स आणि पॅरिसमधील उपनगरात लोक रस्त्यावर उतरून सरकार आणि पोलिसांचा निषेध करत आहेत.
हेही वाचा : ”दंगलींसाठी व्हिडीओ गेम जबाबदार”, फान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन स्पष्टच बोलले; पालकांना आवाहन करत म्हणाले…
अनेक ठिकाणी हिंसाचारच्या घटना समोर आल्या आहेत. संतप्त जमावाकडून गाड्यांची जाळपोळ, इमारती आणि दुकानांची लुटमार सुरु आहे. पोलिसांनी १ हजारांहून आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पालकांना आवाहन केलं आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, “पालकांनी आपल्या मुलांना घरातून बाहेर पडू देऊ नये.”
हेही वाचा : अमेरिकेतील विद्यापीठांत वंशआधारित प्रवेशांना मनाई, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ
दंगल कुठे उफाळली आहे?
पॅरिसमधील उपनगरे, नॉनटेअर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन हिंसक झालं आहे. तसेच, दक्षिणेतील टुलुझ आणि उत्तरेकडील लिले येथे आग लावण्याच्या आणि चकमकीच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.