नेपाळला शनिवारी बसलेल्या जोरदार भूकंपापेक्षाही अजून महाभूकंपाची शक्यता जिओ हॅझार्ड्स संस्थेचे हरिकुमार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त ‘द असोसिएटेड प्रेस’ने दिले आहे. दरम्यान, नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज व औषधे यांच्या तीव्र टंचाईला सामोरे जाणारे आणि भीतीच्या सावटाखाली वावरणारे हजारो लोक उघडय़ावर मुक्कामाला आहेत. येथील बळींची संख्या ४००० वर गेली असून, देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. भारतातील बळींची संख्या ७२ झाली आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पश्चिम बंगालला ५.२ रिश्टर स्केलचा धक्का बसला.
जिओ हॅझार्ड्स संस्था भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करते. शनिवारी नेपाळला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र भारत-नेपाळ सीमेवर हिमालयाच्या परिसरात भूगर्भात मोठा दाब तयार होत आहे. तो या भूकंपाच्या धक्क्यातून तो बाहेर आलेला नाही. त्यामुळे अजून महाभूकंपाची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. यापूर्वी नेपाळला १९३४ मध्ये ८ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला होता, याचीही आठवण संस्थेने करून दिली आहे.
नेपाळमधील भूकंपाला ४८ तास उलटून गेले असताना अनेक ढिगाऱ्यांखालून अद्याप मृतदेह सापडत आहेत. या भूकंपात ८ हजारांहून अधिक लोक जखमी, तर हजारो बेघर झाले आहेत. भारतासह अनेक देशांची मदत पथके काठमांडूत कार्यरत आहेत. काठमांडूची उपनगरे आणि ग्रामीण भागातही इंधन आणि औषधांची टंचाई निर्माण झाली आहे.
देशासमोरील तातडीचे आणि मोठे आव्हान मदत हेच आहे. जगातील देशांनी आम्हाला विशेष मदत साहित्य आणि वैद्यकीय चमू पाठवाव्यात. या संकटातून मार्ग काढण्यासाठी विदेशातील आणखी तज्ज्ञ मिळण्याची आम्हाला अतिशय गरज आहे. लोकांनी आम्हाला अत्यावश्यक असलेले तंबू, सुक्या वस्तू, ब्लँकेट्स, चादरी आणि ८० वेगवेगळी औषधे पाठवण्याचे आम्ही आवाहन करत आहोत, असे नेपाळचे उच्चपदस्थ अधिकारी लीलामणी पॉडेल म्हणाले.
भारताची मोठी मदत
भारताने मदत आणि पुनर्वसनाचे काम फार मोठय़ा प्रमाणावर हाती घेतले आहे. लष्कराची १३ विमाने फिरती रुग्णालये, औषधे, ब्लँकेट्स, ५० टन पाणी व इतर साहित्य घेऊन गेली आहेत. भारत मदतकार्यात आणखी कशी मदत करू शकतो, याचा आढावा घेण्यासाठी भारतातून वरिष्ठस्तरीय आंतर-मंत्रालयीन चमू नेपाळमध्ये पोहचला.
नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी खासदारांनी एका महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी धक्कादायक खुलासा केला. गृहमंत्री असूनही मला या भीषण आपत्तीची माहिती नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भूकंपाची माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून काम सुरू केले व हे सांगताना संकोच वाटत नसल्याची कबुली राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली.
..म्हणून जैतापूर नकोच – राऊत
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भूकंपाच्या चर्चेच्यानिमित्ताने जैतापूरला अणू ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात न करण्याची विनंती सरकारला केली. जैतापूर व रत्नागिरी या शहरांना यापूर्वी ५.५ रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाचे धक्के बसले आहेत. भविष्यात जैतापूरमध्ये अणू ऊर्जा प्रकल्प उभा राहिल्यास व आपत्ती ओढवल्यास त्याचे भीषण परिणाम होतील, अशा इशारा राऊत यांनी दिला.
२५०० भारतीयांची सुटका
दरम्यान, राज्यातील अडकलेल्या निम्म्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात यंत्रणा कमी पडत आहेत, त्यामुळे नेपाळमधील हजारो भूकंपग्रस्त नागरिकांसोबतच तेथे अडकलेल्या भारतीय पर्यटकांची अधीरताही वाढली आहे. नेपाळमधून २५०० भारतीयांची सुटका करण्यात आली असून तेथे अडकून पडलेल्या व भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
* बचावकार्य एनडीआरफच्या जवानांनी दहा जणांना वाचविले; ढिगाऱ्याखालून ४६ मृतदेह काढले.
* एनडीआरएफच्या सहा अतिरिक्त तुकडय़ा काठमांडूला रवाना
* लष्कराचे एक कृती दल व १८ चिकित्सा दल नेपाळमध्ये मदतकार्यात सहभागी
* २२ टन खाद्यसामग्री, ५० टन मिनरल पेयजल, २ टन औषधे, १४०० जणांसाठी अंथरुण-पांघरुण तर ४० तंबू भारताने पाठवले