नवी दिल्ली : विमाने किंवा विमानतळांवर बॉम्ब असल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांत अशा तब्बल ८० अफवा उठल्या. एकट्या मंगळवारी विविध विमान कंपन्यांना धमकीचे ५० संदेश आले आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये १७०पेक्षा जास्त विमानांना याचा फटका बसला असून कंपन्यांना सुमारे ६०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ‘इंडिगो’ आणि ‘एअर इंडिया’च्या प्रत्येकी १३ विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे संदेश कंपन्यांना प्राप्त झाले. ‘अकासा एअर’च्या १२ आणि ‘विस्तारा’च्या ११ विमानांबाबतही संबंधित कंपनीलाही अशाच धमक्या मिळाल्या. याखेरीस सोमवारी रात्री इंडिगो, एअर इंडिया आणि विस्ताराला ३० विमानांमध्ये स्फोटके असल्याचे संदेश पाठविण्यात आले. गेल्या नऊ दिवसांमध्ये भारतीय विमान कंपन्यांना १७० संदेश मिळाले असून तपासणीअंती या सर्व अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सर्व विमान कंपन्यांना मिळून ६०० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागल्याची माहिती एका देशांतर्गत कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. धमक्यांचे प्रकार थांबविण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. धमक्या देणाऱ्यांना ‘नो फ्लाय’ यादीत टाकण्यापासून ते कायद्यात दुरुस्ती करण्यापर्यंत अनेक मार्ग विचाराधीन असले, तरी अद्याप यावर ठोस उपाय सापडलेला नाही.

हेही वाचा >>> JPC Meet On Waqf Bill : वक्फ’च्या बैठकीत गोंधळ

ट्वीटद्वारे धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील विमानांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच असून मंगळवारीही एक्स (ट्वीटर) हँडलद्वारे १० विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली. याप्रकरणी सहार पोलिसांनी अनोळखी ट्वीटर खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या १० दिवसांत मुंबई पोलिसांनी १० गुन्हे दाखल केले असून त्यात विमानात बॉम्ब असल्याचे संदेश अथवा ईमेल करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे.

आर्थिक फटक्याचे गणित

● एका देशांतर्गत सेवेमध्ये अडथळा निर्माण झाल्यास कंपनीला १.५० कोटींचे नुकसान सहन करावे लागते.

● आंतरराष्ट्रीय सेवेमध्ये अडचणी आल्यास हा भुर्दंड ५ ते ५.५० कोटींच्या घरात जातो.

● एका विमानाला मिळालेल्या धमकीमुळे सरासरी ३.५ कोटींचा भार कंपन्यांवर पडतो.

● ढोबळमानाने हिशेब केल्यास नऊ दिवसांमध्ये कंपन्यांना ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nearly 80 flights receive bomb threats caused airlines loss of rs 600 crore zws