नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ातील खनिज उत्खननासाठी सुरक्षा पुरविण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे जिल्हय़ातील खाण व्यवसाय सुरू झालेला नाही. तो सुरू होण्यासाठी निमलष्करी दलाची मदत फडणवीस यांनी केंद्रीय गृह विभागाकडे मागितली आहे. खनिज उत्खनन सुरू झाल्यावर प्रक्रिया उद्योग जिल्हय़ातच सुरू करावा; ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांच्यासह केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहिर, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीष आत्राम, खा. नाना पटोले, अशोक नेते उपस्थित होते. नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी राज्य व केंद्र सरकारने चालवली असून खनिज उत्खनन सुरू करणे हा याच रणनीतीचा भाग मानला जात आहे.
राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले की, नक्षलग्रस्त भागात खनिज संपत्तीवर आधारित उद्योग सुरू व्हावे. ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. खनिज उत्खनन व त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास जिल्हय़ातील अनेक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. उद्योग सुरू करण्यासाठी रस्ते व रेल्वे मार्ग विस्तारीकरण करावे लागेल. त्या संदर्भात राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्याचे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्य़ाच्या विकासाचा कृती आराखडा तयार केला आहे.
हा आराखडा आजच्या बैठकीत सादर करण्यात आला. ज्यानुसार जिल्हय़ातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे युवकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था होईल. खनिज उत्खनन सुरू झाल्यावर प्रक्रिया उद्योग उभे राहतील. यातून मोठय़ा प्रमाणावर प्रशिक्षित युवकांना रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य सरकारने गृह खात्याकडे व्यक्त केला आहे.

Story img Loader