बीएसएफ जवान नरेंद्र सिंह यांची पाकिस्तानी सैन्याने केलेली निर्घृण हत्या त्यानंतर काश्मीरमध्ये पोलिसांचे अपहरण करुन झालेल्या हत्या यामुळे सीमेवरील वातावरण तापले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पुन्हा एकदा सीमा पार करुन दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तान सरकार जो पर्यंत लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेवर नियंत्रण आणणार नाही तो पर्यंत सीमेवरील परिस्थितीत सुधारणा होणार नाही असे मत रावत यांनी व्यक्त केले. इंडिया टुडेशी ते बोलत होते. दहशतवादी पोलिसांना लक्ष्य करतायत त्यातून त्यांची हताशा दिसून येते असे रावत म्हणाले.

शुक्रवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात तीन पोलिसांचे अपहरण करुन त्यांची हत्या केली. यात दोन अधिकारी होते. पाकिस्तान काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करुन काश्मिरी युवकांना कट्टरपंथीय विचारधारेच्या दिशेने नेत असल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीकेचे आसूड ओढले. पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यात शांतत नकोय, त्यांना हिंसाचार हवा आहे असे रावत म्हणाले. पाकिस्तान बरोबर चर्चा रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

Story img Loader