Neelam Gorhe : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
नेमकं नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं आहे?
कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं असंही म्हणाल्या.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा धन्यता वाटली होती पण…
२०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयासाठी भेट मिळणार नाही, दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाही. यानंतर प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतरं होतात ती काही मुदपाक खान्याच्या विश्लेषणातून होत नाहीत. एकनाथ शिंदे यांना नुकताच महादजी शिंदे पुरस्कार मिळाला आहे. ते या सगळ्यावर बोलतील. असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नीलम गोऱ्हेंच्या विधानावर अंबादास दानवे काय म्हणाले?
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलं. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवर ही टीका केली आहे.