Neeraj Chopra on Arshad Nadeem : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीम याला भारतात आयोजित एनसी क्लासिक स्पर्धेचं निमंत्रण पाठवलं होतं. त्यावरून नीरजवर टीका होत होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यामुळे नीरजवर अनेकांनी समाजमाध्यमांवरून टीका केली होती. या प्रकरणावर आता नीरजने मौन सोडलं आहे. नीरजने देखील समाजमाध्यमावर एक पोस्ट करून त्याचं म्हणणं मांडलं आहे. तसेच त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

नीरज म्हणाला, “अर्शद नदीमला निमंत्रित केल्याबद्दल माझ्या कुटुंबावर टीका केली जात आहे. आमच्याबद्दल द्वेष पसरवला जातोय, अपप्रचार केला जातोय. हे मी कधीच सहन करणार नाही. माझ्यासाठी नेहमीर राष्ट्रपथम होत आणि आहे. मी कमी बोलणारा माणूस आहे. याचा अर्थ असा नव्हे की माझ्या कुटुंबाबद्दल, देशाप्रती माझ्या मनात असलेल्या प्रेमावर कोणी प्रश्न उपस्थित केले तर मी बोलणारच नाही.”

नीरज चोप्राने त्याच्या निवेदनात काय म्हटलंय?

भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदकं पटकावणारा नीरज चोप्रा म्हणाला, “मी अर्शदला एनसी क्लासिक स्पर्धेसाठी निमंत्रण दिलं हे एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला दिलेलं निमंत्रण होतं. याचे वेगळे अर्थ काढू नये. जगभरातील सर्वोत्तम खेळाडू भारतात आणणे हे एनसी क्लासिकचं मुख्य उद्दीष्ट आहे. आपण यंदा या विश्वस्तरीय स्पर्धेचं आयोजन करत आहोत. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या दोन दिवस आधी मी अर्शदला एन. सी. क्लासिक स्पर्धेचं निमंत्रण पाठवलं होतं. पुढच्या ४८ तासांत अशा काही घटना घडल्या की त्यानंतर अर्शदला भारतात निमंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिथे देशाच्या हिचाचा विषय असेल तिथे मी सर्वात पुढे उभा असेन.

नीरजने मांडली व्यथा

नीरज म्हणाला, “मी माझ्या देशासाठी खेळतो, माझ्या देशाचं नाव उंचावण्यासाठी काम करतो. तरी देखील माझ्या ईमानदारीवर संशय उपस्थित केला जात आहे. हे सगळं पाहून मला खूप दुःख झालं आहे. काही लोक माझ्या कुटुंबावर निशाणा साधतायत. मला त्यांना सांगावं लागतंय की आम्ही सामान्य लोक आहोत. दुसऱ्या बाजूला, प्रसारमाध्यमांतील काही लोक माझ्या नावाने वेगवेगळ्या खोट्या गोष्टी पसरवत आहेत. मी त्यावर काही बोललो नाही, बोलत नाही याचा अर्थ असा नाही की ते सगळं खरं असेल.