पाटणा : नवी दिल्ली : वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांच्या तपासासाठी सीबीआयची पथके सोमवारी बिहार आणि गुजरातला पोहोचली. सीबीआयने बिहार, गुजरात आणि राजस्थानमधील पाचपेक्षा जास्त गुन्ह्यांचा तपास स्वत:कडे वर्ग करून घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. त्याबरोबरच लातूरमधील गुन्ह्याचा तपासही सीबीआय स्वत:कडे घेऊ शकते असे त्यांनी सांगितले.
बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखाने (ईओयू) आतापर्यंत या प्रकरणाचा तपास केला असून त्यांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांमधून प्रश्नपत्रिका फुटल्याचे सर्व संकेत मिळत असल्याचे त्यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे. दुसरीकडे, राजस्थान उच्च न्यायालयाने ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करावी आणि ती पुन्हा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ला सोमवारी नोटीस बजावली.
हेही वाचा >>> ‘यूपीएससी’ परीक्षेवर ‘एआय’ची नजर; फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे देखरेख
देशभरात उद्भवलेल्या वादानंतर सीबीआयने रविवारपासून ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा तपास सुरू केला आणि एफआयआरही नोंदवला. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सीबीआयचे अधिकारी या प्रकरणी ‘ईओयू’ने मिळवलेले पुरावे संकलित करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘‘तपासादरम्यान ईओयूने जमा केलेल्या पुराव्यांमध्ये पाटण्यातील एका घरातून मिळवलेले जळालेल्या प्रश्नपत्रिकांचे तुकडे, अटक केलेल्यांचे मोबाईल फोन, सिम कार्ड, लॅपटॉप, नंतरच्या तारखांचे धनादेश आणि ‘नॅशलन टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) दिलेल्या संदर्भ प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.’’ सीबीआयच्या अन्य एका पथकाने गुजरातमधील गोध्रा येथे तपास सुरू केला असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. गोध्रा पोलिसांनी संशयितांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
‘एनएसयूआय’चा संसदेवर मोर्चाचा प्रयत्न
काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या ‘एनएसयूआय’ने सोमवारी संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि २०पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ५ मे रोजी झालेली ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करा आणि नव्याने परीक्षा घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ज्या तरुण आणि तरुणींसाठी फक्त ‘नीट’ घोटाळा हाच एक मुद्दा आहे त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी काहीतरी बोलायला हवे होते. परीक्षा पे चर्चा हा कधीतरी करण्याचा उपक्रम नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी दीर्घकालीन कटिबद्धता आहे.
– ओमर अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स