NEET-UG Paper Leak Case : नीट-यूजी पेपल लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (१८ जुलै) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा-पदवी २०२४ (नीट-यूजी २०२४) शी संबंधित सर्व याचिकांवर आज निकाल दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक परीक्षा केंद्राचा स्वतंत्र निकाल जाहीर करावा, असे आदेश देत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (२२ जुलै) होईल असंही सांगितलं. ते म्हणाले, “सोमवारी बिहार पोलीस आणि ईओडब्ल्यूचे अहवालही सादर केले जावेत”. या सुनावणीवेळी एनटीएने न्यायालयाला सांगितलं की २४ जुलैपासून नीट-यूजीचं काऊन्सलिंग सुरू होईल.

पेपर फुटले होते ही वस्तुस्थिती आहे : सरन्यायाधीश

दरम्यान, या सुनावणीवेळी महाधिवक्ते तुषार मेहता यांनी न्यायालयाला विनंती केली की परीक्षा केंद्र जाहीर करू नयेत. मात्र न्यायमूर्ती म्हणाले, केंद्रनिहाय निकाल जाहीर केल्यामुळे आकडेवारीचं स्वरूप स्पष्ट होईल. दरम्यान, चंद्रचूड म्हणाले, पाटणा आणि हजारीबागमध्ये पेपर फुटले होते ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेकांकडे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध होती.

धनंजय चंद्रचूड म्हणाले, “आपण केंद्रनियाह निकाल जाहीर करायला हवेत जेणेकरून आकडेवारीचं, गुणांचं स्वरूप स्पष्ट होईल.” तर या सुनावणीवेळी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएने म्हटलं की “आमच्याकडून परीक्षेच्या नियोजनात कुठलीही कसर राहिली नव्हती. याचिकाकर्त्यांचे आमच्यावरील आरोप खोटे आहेत.”

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी २०२४ नव्याने घेण्यासाठी संपूर्ण परिक्षा प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा ठोस पुरावा असायला हवा. आम्ही या प्रकरणावर लवकरच अंतिम निकाल देऊ. लाखो तरुण विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आम्हाला सर्व बाजू तपासून, पुरावे पाहून निकाल द्यायचा आहे.

हे ही वाचा >> उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात, डिब्रुगड एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले!

पेपर चोरणाऱ्या दोघांना सीबीआयकडून अटक

सीबीआयने मंगळवारी नीट युजी परीक्षेचे पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक केली आहे. यापैकी एकाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ट्रकमधून हे पेपर चोरले होते. पंकज कुमार आणि राजू सिंग अशी त्यांची नावे आहेत. पेपर चोरणे आणि ते हजारो-लाखो रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात या दोघांचा हात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet ug paper leak supreme courts orders nta publish results on website asc