नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’मधील कथित गैरप्रकारांबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) इशारा दिला. परीक्षा आयोजित करताना कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता केंद्र सरकार खपवून घेणार नाही. त्रुटी आढळल्यास ‘एनटीए’चे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल, असे प्रधान यांनी सांगितले.
परीक्षेचे पेपर चुकीचे वाटले गेलेल्या आणि वेळेचे नुकसान भरून काढण्यासाठी वाढीव गुण देणाऱ्या सहा परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे प्रधान यांनी नमूद केले. ‘नीट-यूजी’मधील गैरप्रकाराच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष दिले जात असून उत्तरदायित्व निश्चित केले जाईल आणि त्रुटी आढळल्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘नीट’ परीक्षार्थींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर केल्या जातील. संबंधित सर्व तथ्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत, असे प्रधान म्हणाले. ‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटले नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
काँग्रेस वि. भाजप
नीट-यूजी परीक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. या प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. पेपर फुटला नसेल तर बिहारमध्ये १३ आरोपींना अटक का करण्यात आली, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला. तर, काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने ते सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी नवा मुद्दा शोधात आहेत. असत्य व तथ्यहीन गोष्टींच्या आधारे विद्यार्थ्यांची व जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, अशी टीका प्रधान यांनी केली.
‘नीट’सारखे घोटाळे संपुष्टात आणू- स्टॅलिन
नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे सर्वप्रथम तामिळनाडूने सांगितले. वैद्याकीय अभ्यासक्रमांतील प्रवेश विना अडथळा सुनिश्चित करण्यासाठी ‘नीट’सारखे घोटाळे आम्ही संपुष्टात आणू, असा दावा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला. समाज, आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती शिक्षणात अडथळा ठरू नये, हे माझे उद्दिष्ट आहे. त्यासाठी यांसारखे घोटाळे संपवण्याचे आमचे ध्येय आहे, असे स्टॅलिन यांनी सांगितले.
केवळ सहा केंद्रांमुळे संपूर्ण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. मी संसदेत तथ्यांसह उत्तर देणार आहे. – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री