एपी, मॉस्को

रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी चर्चा करणार असल्याची माहिती क्रेमलिन या रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या चर्चेमध्ये दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटी केल्या जातील. मात्र, या चर्चेमध्ये युक्रेनला सहभागी करून घेतले जाणार नाही. दुसरीकडे, आपल्याला या चर्चेत रस नसल्याचे सांगत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की सोमवारी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले. तर याच युद्धाशी संबंधित चर्चा करण्यासाठी पॅरिसमध्ये युरोपीय नेत्यांची बैठक होत आहे.

रशिया व अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांदरम्यान मंगळवारी सौदी अरेबियामध्ये चर्चा होणार आहे. रशियाने तीन वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांदरम्यान होणारी ही सर्वात महत्त्वाची चर्चा असणार आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक पातळीवर रशियाला एकटे पाडण्यासाठी अमेरिकेने रणनीती आखली होती. मात्र, ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून हे धोरण मागे घेतले जात आहे.

क्रेमलिनचे प्रक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सांगितले की, या बैठकीत सहभागी होण्यासाठी सोमवारी उशिरा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी युशाकोव्ह हे सौदी अरेबियाला जाणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे अमेरिकेतर्फे चर्चेत सहभागी होतील असे अमेरिकेने सोमवारी सांगितले.

झेलेन्स्की ‘यूएई’मध्ये

दुबई : सौदी अरेबियामध्ये मंगळवारी रशिया व अमेरिकेच्या शिष्टमंडळादरम्यान चर्चा होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) दौरा केला. ज्या चर्चेमध्ये आपला सहभाग नाही त्या चर्चेचे फलित आपण मान्य करणार नाही असे त्यांनी सांगितले. ते म्युनिकमधील सुरक्षा परिषद आटोपून थेट ‘यूएई’ला रवाना झाले. त्यांनी अबुधाबी येथे ‘र्यूएई’चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि युक्रेनमधून बाहेर गेलेले अनेकजण ‘यूएई’त राहत आहेत. त्यामुळे तिथेच शांतता चर्चा होण्याची शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, आता ही चर्चा सौदी अरेबियामध्ये होणार आहे.

पॅरिसमध्ये युरोपीय नेत्यांची बैठक

दुसरीकडे, शांतता चर्चेदरम्यान युक्रेनला गरज भासल्यास आपण शांतता सैन्य पाठवण्यास तयार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी स्पष्ट केले. युक्रेन युद्धाविषयी अमेरिकेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेने युरोपीय देशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, युक्रेन युद्धासंबंधी चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी सोमवारी पॅरिसमध्ये युरोपीय देशांची बैठक बोलावली. त्याला युरोपीय महासंघाचे सदस्य देश आणि ब्रिटनचे नेते उपस्थित आहेत.

Story img Loader