संतापाच्या भरात पंडित नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेल यांना तुम्ही पूर्ण जातीयवादी आहात, असे म्हटल्याचा दावा भाजप नेते लालकृष्ण अडवाणी एका पुस्तकाचा दाखला देऊन केला. त्यामुळे आता नवा वाद होण्याची चिन्हे आहेत.
स्वातंत्र्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणावेळी लष्करी कारवाईवरून नेहरू आणि पटेल यांच्यात वाद झाला. एम. के. के. नायर यांनी आपल्या ‘दि स्टोरी ऑफ अॅन इरा टोल्ड विदाऊट थ्री विल’ या पुस्तकात उल्लेख केल्याचा दाखला अडवाणींनी आपल्या ब्लॉगवर दिला आहे.
हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणाचा प्रश्न गंभीर बनला होता. निजाम पाकिस्तानशी संधान साधून होता. त्याचे अधिकारी जनतेवर अत्याचार करीत होते. मंत्रिमंडळ बैठकीत गृहमंत्री या नात्याने पटेल यांनी या परिस्थितीचे वर्णन करून हैदराबादमध्ये लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली. नेहमी संयमी बोलणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांचा संयम सुटला. तुम्ही संपूर्ण जातीयवादी आहात, तुमची शिफारस मी कदापि स्वीकारणार नाही असे बजावले. त्यानंतर हातातील कागदपत्रे घेऊन पटेल खोलीबाहेर निघून गेल्याचा उल्लेख नायर यांनी केल्याचे अडवाणींनी स्पष्ट केले आहे. राज्यपाल राजाजी यांनी नेहरूंना हैदराबादला लष्कर पाठवण्याची मागणी केली होती. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे राजाजी यांनी नेहरू आणि पटेल यांच्या निदर्शनास आणले. लष्कर पाठवल्यास आंतरराष्ट्रीय परिणामांची नेहरूंना चिंता होती. मात्र  देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कारवाईसाठी आणखी विलंब लावता कामा नये, असे राजाजींचे मत होते. अखेर त्यांनी रझाकारांच्या अत्याचाराबाबत ब्रिटनच्या राजदूताच्या पत्राचा दाखला दिला. त्यानंतर नेहरूंनी कारवाईचे आदेश दिल्याचा पुस्तकात उल्लेख आहे.
यापूर्वी सरदार पटेल यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणाची देशाला गरज आहे मतपेटीच्या राजकारणाची नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. मोदी आणि अडवाणी हे दोघेही पटेल यांचा वारसा आपणच पुढे नेत असल्याचा दावा करत असल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आताही अडवाणींच्या नव्या ब्लॉगने वाद होण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader